बाबा रामदेव यांना मोठा धक्का ! ‘या’ प्रकरणात पतंजलिला ठोठावला 1 कोटींचा दंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2018 चे उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजली पेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने योग गुरु रामदेव बाबा यांच्या कंपनीला हा दंड ठोठावला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पतंजली पेय प्रायव्हेट लिमिटेडकडून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2018 चे उल्लंघन केले. यामुळे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने हा दंड ठोठावला आहे. या संदर्भात पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजारीवाला यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. पतंजलीसह कोक, पेप्सिको आणि बिस्लेरी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परंतु इतर कंपन्यांवर करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात मंडळाने माहिती देण्यास नकार दिला आहे.

पतंजली पेय प्रा. लि. कंपनीला फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2020 मधील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2018 च्या अंतर्गत नोंदणी अर्ज करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. परंतु कंपनीने यावर कोणतेही उत्तर दिले नाही, अशी माहिती केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आली.

काय आहे नियम ?

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2018 च्या कलम 9(1) नुसार नियम जाहीर झाल्यापासून सहा महिन्यात निर्माते नियोजित जबाबदारीनुसार कामे पूर्ण करतील. तसेच कलम 9(2) नुसार मल्टिलेयर प्लास्टिक सॅशे, पाऊच आणि पॅकेजिंग कलेक्शन याची जबाबदारी उत्पादक, उत्पादने आयात करणाऱ्या कंपन्या आणि ब्रँड मालकांची असेल. परंतु या नियमांचे पालन न केल्या प्रकरणी पतंजलीसह इतर कंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.