क्रिकेट इतिहासातील ती मॅच, जेव्हा एका चेंडूवर काढल्या होत्या 268 धावा, क्रीजवर 6 KM धावले होते खेळाडू

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये अनेक असे रेकॉर्ड बनवण्यात आले आहेत, ज्यावर फॅन्स सहज विश्वास ठेवू शकत नाहीत. क्रिकेटच्या इतिहासात अशीसुद्धा एक मॅच झाली आहे ज्यामध्ये एका टीमने चेंडूवर 268 धावा बनवल्या होत्या. ही मॅच 1894 मध्ये खेळण्यात आली होती, ज्यामध्ये दोन खेळाडूंनी केवळ धावून-धावून एका चेंडूवर 268 धावा बनवल्या होत्या. इतकेच नव्हे, तर या एका चेंडूनंतर आपला डावसुद्धा घोषित केला आणि मॅचसुद्धा जिंकली.

झाडावर अडकला होता चेंडू
15 जानेवारी 1894 ला ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया आणि स्क्रॅच इलेव्हनमध्ये सामना झाला होता. बॉनबरीच्या मैदानावर ही मॅच खेळवण्यात येत होती. मॅचच्या दरम्यान फलंदाजाने लाँग शॉट मारला आणि चेंडू जाऊन बाऊंड्रीच्या किनार्‍यावरील एका झाडावर अडकला. हे झाड मैदानाच्या मध्येच होते आणि फिल्डिंग टीमने अम्पायरला अपील केले होते की, चेंडू हरवल्याचे घोषित करा, परंतु असे झाले नाही. फलंदाजांना धावा काढण्यापासून रोखले गेले नाही.

अंपायर्सचे म्हणणे असे होते की, चेंडू झाडावर अडकलेला दिसत होता, यामुळे तो हरवला असे घोषित करता येणार नाही.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाही हा रेकॉर्ड
इएसपीएन क्रिकइन्फोमध्ये छापलेल्या एका ब्लॉगमध्ये क्रिकेटर रायटर मायकल जोन्सने लिहिले आहे, या बातमीचा एकमेव स्त्रोत त्यावेळचे इंग्रजी वृत्तपत्र पॉल मॉल गॅझेट होते. त्याच्याच स्पोर्ट पेजवर ही आगळी-वेगळी बातमी छापली होती. त्यानंतर ही बातमी इंग्लंड, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि अंकांमधून प्रसिद्ध झाली. मात्र, ही मॅच रेकॉर्ड होऊ शकली नाही, याच कारणामुळे गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा तिची नोंद झाली नाही.