6 सेंकदांचा ‘वेळ’ अन लाखोंचा ‘नफा’ ! क्रिकेट सामन्यावरील सट्ट्यात बुकीचा असाही नवा ‘फंडा’

पुणे : भारत आणि इंग्लड यांच्या सध्या गहुंजे स्टेडियमवर वन डे क्रिकेट सामने होत आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी नाही. त्यामुळे या सामन्याचे उपग्रह वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होत आहे. प्रेक्षक नसल्याने सामन्यात नेमके काय घडत आहे, याचे टीव्हीवर सामना पाहतानाच लक्षात येते. परंतु, मैदानावर प्रत्यक्ष बॉल टाकल्यानंतर तो टीव्हीवर दिसण्यासाठी ६ सेकंदाचा फरक आहे. या ६ सेंकदामध्ये बुकी प्रत्यक्ष मैदानातील बॉल पाहून त्याप्रमाणे सट्टा लावून लाखो रुपयांचा नफा मिळवत असल्याचे आढळून आले आहे.

विविध राज्यातील आलेल्या या बुकींनी व सट्टा खेळणार्‍या सटोडियांनी गहुंजे स्टेडियम समोरील एका उंच इमारतीत आपला मुक्काम केला होता. तसेच स्टेडियमलगत असलेल्या डोंगरावरही काही जण थांबले होते. या ठिकाणावरुन मोठ्या लेन्सच्या कॅमेर्‍याद्वारे ते प्रत्यक्ष मैदानावर काय घडत आहे, हे पाहून तशा सूचना बरोबर असलेल्या दुसर्‍याला देत व त्याप्रमाणे ते प्रत्येक बॉलला काय घडणार यावर सट्टा लावत होते. प्रत्यक्षात ते सामना पाहूनच सट्टा लावत असल्याने त्यांचा सट्टा हा बरोबर येत असत. त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणावर मिळकत होत होती.

तसेच लेमन ट्री या हॉटेलमध्ये काही बुकी बसले होते. तेथून ते सट्टा लावत तसेच सट्टा घेत असत़ हे समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मोहाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड पोलिसांनी एकाच वेळी छापा टाकून ही सट्टेबाजी उघडकीस आणली आहे. नागपूर कनेक्शन देशभरात मध्य प्रदेश आणि नागपूर येथून मोठ्या प्रमाणावर सट्टा घेतला जातो. या सट्ट्यामध्ये नागपूरचे कनेक्शन उघड झाले आहे. नागपूरमधील चेतन सोनू याचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली असून पिंपरी चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.