परमबीर सिंग यांनी 3.45 कोटींची खंडणी उकळली; ‘या’ बड्या क्रिकेट बुकीचा खळबळजनक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आता खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी मोक्का लावून माझ्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केल्याचे सांगितले.

अनिल देशमुख हे गृहमंत्रिपदावर असताना परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता. आता परमबीर सिंग यांच्यावरच गंभीर आरोप करण्यात आला आहे. बुकी सोनू जालान याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिस महासंचालकांनी हे प्रकरण तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती दिली जात आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोनू जालान याने पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.

पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्याबाबतचे पत्रही पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

परमबीर सिंग यांनी आपल्याकडून 1 कोटी 25 लाख रुपये उकळले. याप्रकरणी परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केतन तन्ना या व्यक्तीनेही केली आहे.