UAE मध्ये IPL : फक्त 3 ठिकाणी होणार सर्व सामने, 22 ऑगस्टला रवाना होईल ‘धोनी सेना’

पोलिसनामा ऑनलाइन : कोरोनामुळे जगभरातील सर्व स्पर्धा स्थगित केल्या जात होत्या. अशातच क्रिकेट विश्वासंबंधी एक दिलासादायक बातमी आहे. आता केंद्र सरकारने BCCI ला IPL संयुक्त अरब अमिरातीत (UAE) भरवण्याबद्दल अधिकृत परवानगी दिली आहे. याबद्दलची माहिती IPL चे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली. या स्पर्धा UAE मध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर याकाळात होणार आहेत.

UAE मध्ये या स्पर्धेचे सामने फक्त तीन ठिकाणी होतील. त्यामध्ये शारजाह, दुबई आणि अबुधाबी या ठिकाणांचा समावेश आहे. कोरोना महामारीमुळे या स्पर्धा भारतात आयोजित करता येत नव्हत्या म्हणून त्या UAE मध्ये घेण्यास केंद्र सरकारने मागील आठवड्यातच हिरवा कंदील दाखवला होता.

महत्वाचे म्हणजे भारतातील कोणतीही मुख्य स्पर्धा देशाच्या बाहेर भरावयाची असेल तर त्याला गृह, खेळ आणि विदेश मंत्रलयांची परवानगी घ्यावी लागते. आता याबाबद्दल सरकारकडून लिखित परवानगी मिळाल्यामुळे स्पर्धा होण्याबद्दल शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे आता सर्व संघांना याबद्दल माहिती दिली जाईल, असं BCCI च्या एका आधिकाऱ्याने सांगितले आहे.

बरेच संघ 20 ऑगस्ट नंतर UAE ला रवाना होतील. याअगोदर त्यांना जाण्यापूर्वी 24 तासांत दोन आरटी पीसीआर टेस्ट कराव्या लागतील. चेन्नई सुपर किंग्ज हा संघ 22 ऑगस्टला जाईल तत्पूर्वी त्या संघाचे चेपॉक मैदानावर लहानसे शिबीर होईल.