मॅचपुर्वी टीम आणि देशाला सोडून पाकिस्तानला पळून गेला ‘हा’ क्रिकेटर, शोधत होते सहकारी खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅचफिक्सिंग प्रकरणात आपल्या चार खेळाडूंना निलंबित केल्यानंतर आता यूएईच्या क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून संघाचा यष्टीरक्षक गुलाम शब्बीर याने देश सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम शब्बीर हा पाकिस्तानमध्ये गेला आहे. देश सोडण्यामागचे कारण अद्याप समोर आले नसून तो सध्या अबू धाबीमध्ये सुरु असलेल्या टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये यूएईकडून खेळत होता. मात्र हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्याआधीच तो देश सोडून गायब झाला आहे.

रविवारी शेवटचा दिसला गुलाम शब्बीर –

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुलाम शब्बीर याला रविवारी शेवटचे पहिले गेले होते. सोमवारी होणाऱ्या सामन्याच्या मीटिंगमध्ये त्याला सहभागी व्हायचे होते, मात्र त्याआधीच त्याने आपला देश सोडला होता. सध्या तो पाकिस्तानमध्ये असल्याची माहिती मिळत असून तो व्यवस्थित आहे. संघाच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार, तो मीटिंगमध्ये न आल्याने आम्ही त्याच्या नातेवाईकांशी आणि मित्रांशी संपर्क साधल्यानंतर तो पाकिस्तानला गेल्याची माहिती आम्हाला मिळाली.

मॅचफिक्सिंगच्या वादळात सध्या यूएईचा संघ –

सध्या यूएईचा संघ मोठ्या संकटात असून नुकतेच त्यांच्या चार खेळाडूंचे निलंबन करण्यात आले आहे. मोहम्मद नवीद, कादिर अहमद, शेमान अनवर यांच्यासह सलामी फलंदाज अशफाक अहमद याला देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर आता गुलाम शब्बीर याने देश सोडल्याने क्रिकेटची स्थिती बिकट झाली आहे.

Visit : Policenama.com