ICC कडून 8 दिवसांमध्ये तिघांवर थेट कारवाई, या देशातील खेळाडूवर बंदी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – गेल्या आठ दिवसांमध्ये आयसीसीनं पुन्हा तिसरी कारवाई केली आहे. बुधवारी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलनं (ICC) कादिर खान (Qadir Khan) हे ताजं प्रकरण असताना आणखी एका खेळाडूवर बंदीची कारवाई केली आहे. भ्रष्टाचारविरोधी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणात युएईचा खेळाडू कादिर खानवर (Qadir Khan) ५ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

झिम्बाब्वे विरुद्ध युएई यांच्यात एप्रिल २०१९ साली झालेल्या मालिकेशी संबंधित प्रकरण आहे. कादिरनं या मालिकेच्या संदर्भातील सट्टेबाजांना उपयोगी माहिती जाणीवपूर्वक सार्वजनिक केली होती. दरम्यान, कादिर खानवर २०१९ साली भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे कादिरवरील निलंबनाचा कालावधी १६ ऑक्टोबर २०१९ पासून लागू होईल असं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे.

त्याचबरोबर ऑगस्ट २०१९ साली नेदरलँड्स आणि युएईमध्ये झालेल्या मालिकेत भ्रष्टाचार करण्यासाठी संपर्क साधण्यात आल्यानंतर कादिरनं ती माहिती आयसीसीला दिली नव्हती. “कादिर खान हा एक अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. त्यानं भ्रष्टाचार विरोधी प्रशिक्षण घेतलं आहे. त्याच्या सारख्या खेळाडूनं भ्रष्टाचार करणं टाळायला हवं होतं. तसंच याबाबत आयसीसीला तातडीनं सूचना द्यायला हवी होती”, असं मत आयसीसीचे अधिकारी एलेक्स मार्शल यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि फास्ट बॉलर हीथ स्ट्रीक (Heath Streak) याच्यावर मागच्या आठवड्यात भ्रष्टाचारप्रकरणी ८ वर्षांची बंदी घालण्यात आली, त्यानंतर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहरा लोकुहितगे (Dilhara Lokuhettige) याच्यावरही आयसीसीने ८ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. आयसीसीनं भ्रष्टाचार विरोधी प्रकरणात केलेली ही आठ दिवसांमधील तिसरी कारवाई आहे. तसेच आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचार विरोधी लवादाला लोकुहितगे दोषी आढळला. ३ एप्रिल २०१९ पासून लोकुहितगेचं निलंबन सुरू झालं आहे, कारण त्यावेळीच त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई करण्यात आली होती.