World Cup 2019 : भारत पाकिस्तानला १०० % हरवणार ; ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे भाकीत

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४६ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात. मात्र यात सर्वांचे लक्ष लागून असते ते भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याकडे. या सामन्याचा समावेश हाय वोल्टेज सामन्यांत असतो. भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमधील या सामन्यात क्रिकेट रसिकांबरोबरच खेळाडूंवर देखील तितकाच दबाव असतो. काही वेळा फायनलपेक्षा या सामन्याला जास्त महत्व प्राप्त होत असते.

या वर्षीच्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान १६ जून रोजी एकमेकांच्या समोर येणार आहेत. आतापासूनच या सामन्यात कोण जिंकणार याचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड याने या विषयावर भाष्य करताना म्हटले आहे कि, या सामन्यात भारत पाकिस्तानला सहज नमवेल. भारताला या सामन्यात जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. स्‍टार री इमेजिन अवार्ड समारंभात बोलताना त्याने हे भाष्य केले. १९९९, २००३ आणि २००७ मध्ये भारताकडून विश्वकप खेळणाऱ्या या खेळाडूने पुढे बोलताना म्हटले कि, सर्व सामने हे मोठ्या धावसंख्येचे होणार असून सामन्याच्या मधल्या षटकात बळी घेणाऱ्या संघाना या स्पर्धेत विजयाची संधी अधिक आहे.

भारतीय संघाविषयी बोलताना द्रविड म्हणाला कि, भारताकडे जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल यांच्यासारखे गोलंदाज असल्याने भारताला चिंता करायची गरज नाही, मात्र स्पर्धा अवघड असणार आहे आणि सर्व सामने अटीतटीचे होणार आहेत. सेमीफायनल मधील चार संघांविषयी द्रविडला विचारले असता तो म्हणाला कि, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे तीन संघ आणि चौथ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेत काट्याची टक्कर होणार आहे. यावेळी बोलताना त्याने महेंद्रसिंग धीनी आणि विराट कोहलीचे देखील कौतुक केले.