ICC कडून क्रिकेटच्या ‘या’ दोन नवीन नियमांत बदल, ‘मॅच’च्या निकालावर होणार परिणाम !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अंतरराष्‍ट्रीय क्रिकेट परिषदने क्रिकेटच्या नियमांत काही बदल केले असून लवकरच या नियमांना लागू केले जाणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. लंडनमध्ये झालेल्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये आता धिम्यागतीने गोलंदाजी झाल्यास कर्णधारावर कारवाई केली जाणार नाही तर संपूर्ण संघाला यापुढे कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे धीम्या गतीने गोलंदाजी झाल्यास यापुढे नवीन नियमांनुसार कर्णधाराबरोबरच संपूर्ण संघाला दंड केला जाणार आहे. त्याचबरोबर आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये असे घडल्यास त्या संघाचे गुण कमी केले जाणार आहेत.

आतापर्यंतच्या नियमांत कर्णधारावर सामन्याच्या मानधनाच्या ५० टक्के दंड आकारला जात असे. त्याचबरोबर इतर खेळाडूंना १० टक्के दंड आकारण्यात येत असे. त्याचबरोबर सलग तीन सामन्यांत असा प्रकार घडला तर कर्णधारावर निलंबनाची देखील कारवाई केली जात असे. या नवीन नियमांमुळे खेळाडूंना आणि कर्णधाराला मोठा दिलासा मिळणार आहे.

बदली खेळाडू मिळणार

त्याचबरोबर एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी आता दुसरा खेळाडू घेता येणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १ ऑगस्टपासून खेळवण्यात येणाऱ्या ऍशेस कसोटी मालिकेत हा नियम लागू होणार आहे. एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडू घेण्याचा नियम देखील बदलण्यात आला आहे. जखमी झालेला खेळाडू संघात ज्या भूमिकेत होता तशाच प्रकारचा दुसरा खेळाडू संघात घेता येईल. त्यामुळे जर गोलंदाज जखमी झाला तर त्याच्या बदली दुसऱ्या गोलंदाजाला संधी दिली जाईल. तर फलंदाज जखमी झाल्यास दुसऱ्या फलंदाजाला संधी मिळेल. मात्र यासाठी तुम्हाला रेफ्रीची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. एक एक ऑगस्टपासून हे नवीन नियम लागू होणार असून यामुळे खेळात मदत होणार आहे.

दरम्यान, या नवीन नियमांचे २०१७ पासून टेस्टिंग सुरु होती. अनेक संघांमध्ये खेळाडू जखमी झाल्यामुळे कमी खेळाडूंसह खेळावे लागल्याने संघाना याचा फटका बसत असल्याने आयसीसीने या संदर्भात निर्णय घेण्याचा विचार केला होता.