Coronavirus : शोएब अख्तरनं भारताकडे मागितली मदत, म्हणाला – आमच्यासाठी हे काम केलं तर PAK नेहमी आठवणीत ठेवेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वेगाने वाढत असून आतापर्यंत जगात या जीवघेण्या रोगामुळे ८८ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. भारतासह पाकिस्तान मधील परिस्थिती देखील गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने कोरोना विषाणूविरूद्ध युद्धात भारताची मदत घेतली आहे. भारतातील सुमारे ६ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १६० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

१० हजार व्हेंटिलेटर
रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने भारताकडे मदत मागितली आहे. त्याने म्हटले, जर भारताने कोरोना विरुद्ध लढ्यात पाकिस्तानसाठी १० हजार व्हेंटिलेटर उपलब्ध केले तर पाकिस्तान या मदतीची नेहमी आठवण ठेवेल. इतकेच नाही तर शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान मधील तीन मॅचच्या सिरीजचा प्रस्ताव देखील दिला.

भारत-पाकिस्तान मध्ये क्रिकेट सीरीज
भारत-पाकिस्तान मध्ये तीन मॅचच्या सिरीजचा प्रस्ताव देत शोएब अख्तरने म्हटले, या दोन देशांचे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं येतात. दोन्ही देश पहिल्यांदाच एकमेकांसाठी खेळतील. आणि जे काही पैसे जमा होतील ते समान वाटून घेऊन पीडितांच्या मदतीसाठी खर्च केले जातील. मी केवळ प्रस्ताव देऊ शकतो, बाकी निर्णय घेणे तर व्यवस्थापनाचे काम आहे.

प्रथम एकमेकांची मदत
शोएब अख्तर काही काळापासून आपल्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जगासमोर आपले मत मांडत आहे आणि यादरम्यान तो भारत आणि पाकिस्तान यांच्यात अधिक चांगल्या संबंधांचे समर्थन करत आहेत. इतकेच नाही तर स्वत: शोएब अख्तरही चॅरिटीचे काम करत असतो. अलीकडे त्याने असेही म्हटले आहे की, हिंदू-मुस्लिम वादाच्या पलीकडे जाऊन कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात दोन्ही देशांनी एकजूट होऊन एकमेकांना मदत केली पाहिजे.