IND VS ENG : इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, विराट कोहली-हार्दिक पांड्याची वापसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताने संघ जाहीर केला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताने एक संघ निवडला असून यामध्ये विराट कोहली कर्णधार म्हणून दिसणार आहे. हार्दिक पंड्या आणि ईशांत शर्माचे देखील संघात पुनरागमन झाले आहेत. दरम्यान, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी संघातून बाहेर आहेत, दोघांनाही ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान दुखापत झाली होती. जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात संधी मिळाली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनचीही संघात निवड झाली आहे.

निवडकर्त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघ निवडला आहे. ज्यामध्ये पृथ्वी शॉला जागा मिळाली नाही. वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज हेदेखील संघाचा दिसणार आहेत. कुलदीप यादवदेखील या टीमबरोबर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये खराब कामगिरी करूनही मयंक अग्रवालची निवड करण्यात आली आहे. ऋद्धिमान साहाला यष्टीरक्षक म्हणून संघात कायम ठेवण्यात आले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया – रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल.

5 फेब्रुवारीपासून सुरु होणार कसोटी मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिला आणि दुसरा कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 13 फेब्रुवारीपासून सुरू होईल. यानंतर, अहमदाबादच्या नवीन मोटेरा स्टेडियमवर 24 फेब्रुवारीपासून डे-नाइट टेस्ट होणार असून मालिकेचा शेवटची कसोटी सामना 4 मार्च रोजी याच मैदानावर खेळला जाईल. कसोटी मालिकेनंतर पाच सामन्यांची टी -20 मालिका 12 मार्चपासून सुरू होईल. अखेर, 23 मार्चपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.