Ind Vs Aus : रवींद्र जडेजा हिरोवरून बनला व्हिलन, 2 भारतीय फलंदाजांना केले रन OUT

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा ( ravindra jadeja) मैदानात तत्परतेसाठी नेहमीच चर्चेत असतो. जाडेजाने बर्‍याच वेळा जबरदस्त फिल्डिंग करून विरोधी संघातील फलंदाजांना धावबाद केले. मात्र, फलंदाजी दरम्यान जडेजाची वृत्ती टीम इंडियासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते. तो सहसा वेगवान धावा घेण्याच्या प्रक्रियेत सहकारी फलंदाजांना धावबाद करतो. सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथला(Steve Smith) थेट थ्रो वर बाद केल्याबद्दल त्याला कौतुकाची थाप तर मिळाली, मात्र दुसरीकडे भारताच्या पहिल्या डावात दोन फलंदाज रन आउट केल्याने त्याच्यावर टीकाही केली जात आहे.

बुमराह-अश्विनला केले रन आउट

195 धावांवर भारताने सहा विकेट गमावल्या, त्यानंतर जडेजाकडून अपेक्षा होती कि, तो खालच्या फळीतील फलंदाजांसह डाव पुढे नेईल. रविचंद्रन अश्विन त्याच्याबरोबर क्रीजवर खेळत होता, त्याने कसोटी सामन्यात चार शतकेही ठोकली आहेत. वेगाने धाव घेण्याच्या नादात जाडेजाने अश्विनला (10) रन आउट केले, जेव्हा त्याला माहित होते कि, अश्विन विकेट्सदरम्यान वेगाने धावत नाही. जडेजाने चार षटकांनंतर पुन्हा तीच चूक जसप्रीत बुमराहबरोबर केली. जाडेजा दोन धाव घेण्याच्या नादात बुमराहला आउट करून बसला. जडेजाच्या या दोन चुकांमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 94 धावांची आघाडी घेता आली.

यापूर्वीही जडेजा हे करून बसला

मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात जडेजामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेला आपली विकेट द्यावी लागली. या सामन्यात 112 धावा करणारा रहाणे मोठी खेळी खेळण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु दुसर्‍या टोकावर त्याच्याबरोबर खेळत जाडेजाने वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि रहाणे रन आउट झाला. त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याला जडेजाने रन आउट केले. पंड्याने बाद होण्यापूर्वी 43 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 76 धावा केल्या होत्या. जडेजाच्या या कृत्यामुळे त्याला सोशल मीडियावर टीका देखील सहन करावी लागली.

भारताचे तीन फलंदाज रन आउट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह रन आउट झाले. 2008 नंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारताने एका डावात विकेट रन आउटने गमावल्या आहेत. 2008 मध्ये वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि युवराज सिंग इंग्लंडविरुद्ध रन आउट झाले.