अखेर कोणत्या पध्दतीनं सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा बॉलर बनू शकतो अक्षर पटेल ? शोएब अख्तरनं सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने इंग्लंडचा 3-1 ने पराभव करून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या मालिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 25 धावांनी पराभव केला. या मालिकेत विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग सर्वत्र शानदार प्रदर्शन केले. यावेळी अक्षर पटेल हा नवीन स्टार म्हणून उदयास आला आहे, तर वॉशिंग्टन सुंदर, आर. अश्विन आणि ऋषभ पंत यांनी देखील उत्कृष्ट प्रदर्शन करत आपली छाप सोडली. या उत्कृष्ट कामगिरी नंतर जगभरातून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. यात पाकिस्तानही मागे राहिले नाही.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाचे जोरदार कौतुक केले आणि सामन्यानंतर इंग्लंडला फटकारले देखील. अख्तर म्हणाला की, इंग्लंडने फक्त खेळपट्टीवर लक्ष केंद्रित केले आणि फलंदाजीवर लक्ष दिले नाही. दुसरीकडे भारतीय संघाने आपले काम आरामात केले.

आपल्या यूट्यूब चॅनलवर अख्तरने सांगितले की, मालिकेत खेळपट्टीवर बरीच चर्चा झाली होती, तर त्यावरच भारताने 365 धावा केल्या. ते त्याच विकेटवर खेळत होते जिथे इंग्लिश फलंदाज संघर्ष करीत होते, जर पंत आणि सुंदर धावा करू शकतात तर इंग्लंड का नाही.

अक्षर पटेलच्या गोलंदाजीचेही अख्तरने कौतुक केले. अख्तरने म्हंटले की, त्याला केवळ गोलंदाजीसाठी उत्तम विकेट मिळाली नाही तर तो एक हुशार गोलंदाजही आहे. सामन्यावर नियंत्रण असताना इंग्लिश खेळाडूंना त्याने एकही संधी दिली नाही. जर त्याला अशी आणखी काही मालिका मिळाली तर तो कदाचित 100 विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनू शकेल.