ICC World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यातील चेंडू विकला गेला ‘इतका’ महाग, किंमत ऐकून व्हाल ‘हैराण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी  क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत भारताने उत्तम कामगिरी करत खेळण्यात आलेल्या १० सामन्यापैकी ८ सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानला अक्षरशः चिरडून टाकले होते. १६ जून रोजी हा सामना खेळवला गेला होता. दोन्हीही संघ आता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मात्र या सामन्यात वापरण्यात आलेला चेंडू, टॉस, त्याचप्रमाणे स्कोर शीट हजारो रुपयांत विकण्यात आले आहेत. चाहत्यांनी वाटेल ती किंमत मोजून या वस्तू खरेदी केल्या आहेत.

या वर्ल्डकपशी निगडित वस्तू ऑफिसियल मेमोराबिला डॉट कॉक्मरिकेट या वेबसाईटवर उपलब्ध असून अनेक क्रिकेट चाहत्यांनी यावरून मोठ्या प्रमाणात या वस्तू विकत घेतली आहेत. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार १६ जून रोजी खेळवण्यात आलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात वापरण्यात आलेला चेंडू सर्वात महाग विकला गेला आहे. हा चेंडू २१५० डॉलर म्हणजेच दीड लाख रुपयांत विकला गेला. त्याचबरोबर इतर वस्तू देखील मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. या सामन्यात वापरण्यात आलेला टॉस १४५० डॉलर म्हणजेच जवळपास एक लाख रुपयांना विकला गेला. त्याचबरोबर स्कोरशीट देखील ११० डॉलर म्हणजेच ७७ हजार रुपयांना विकले गेले.

दरम्यान, भारतीय संघाशी संदर्भात वस्तू मोठ्या प्रमाणात या वेबसाईटवर उपलब्ध असून आता यातील फक्त ३ वस्तू शिल्लक राहिल्या आहेत. भारताने खेळलेल्या सर्व सामन्यातील वस्तू याठिकाणी विक्रीला उपलब्ध आहेत. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर  या सामन्यात वापरण्यात  आलेल्या वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.