IPL 2020 : जाणून घ्या कोण आहे एका ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकत राजस्थान रॉयल्सला जिंकून देणारा राहुल तेवतिया ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शारजाहच्या मैदानावर रविवारी झालेला राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना पाहिला नाही तर तुम्ही आयपीएलचा धडाकेबाज सामना चुकवला. या सामन्यात धावांची त्सुनामी आली होती. ज्या सामन्यात एका ओव्हरमध्ये केवळ ५ षटकार ठोकत बाजी पलटली. हा पराक्रम कोणत्याही प्रसिद्ध फलंदाजाने केलेला नाही, तर एका २७ वर्षीय क्रिकेटपटूने केला आहे, ज्याच्याबद्दल क्रिकेटप्रेमींना जास्त माहिती नाही. राहुल तेवतियाने कॉट्रेलच्या एकाच ओव्हरमध्ये ५ षटकार लगावत हारलेल्या सामन्यात राजस्थानला विजय मिळवून दिला. हा तोच तेवतिया होता, ज्याने आपल्या पहिल्या ८ धावा १९ चेंडूत केल्या होत्या. तर जाणून घ्या राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज फलंदाज राहुल तेवतिया कोण आहे?

३ कोटींचा खेळाडू
राहुल तेवतिया वर्ष २०१८ मध्ये प्रथम चर्चेत आला होता. त्यावेळी २४ वर्षांच्या तेवतियाला खरेदी करण्यासाठी आयपीएलच्या लिलावात संघांमध्ये स्पर्धा होती. त्याची आधारभूत किंमत फक्त १० लाख होती, परंतु काही मिनिटांतच त्याची बोली २.५ कोटींवर पोहोचली. किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खेळणाऱ्या तेवतियाला विकत घेण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली. पण अखेरीस दिल्ली डेअरडेव्हिल्सने तेवतियाला ३ कोटीमध्ये खरेदी केले. पण दोन हंगामांनंतर म्हणजेच गेल्या वर्षी राजस्थानने त्याला आपल्या संघात घेतले.

हरियाणासाठी रणजी करंडक
१९९३ मध्ये हरियाणामध्ये जन्मलेल्या तेवतियाने २०१३ मध्ये रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले होते. तो एक जुन्या पद्धतीचा लेगस्पिनर आहे, ज्याला चेंडू हवेत उडवायला आवडतो. फक्त ७ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे, जिथे त्याने १९० धावा केल्या आहेत. तर या दरम्यान त्याने १७ बळी मिळवले आहेत. तेवतिया बहुधा टी-२० आणि लिस्ट ए सामन्यात खेळतो. आतापर्यंत त्याने ५० टी-२० सामने खेळले आहेत. लिस्ट ए मधील त्याच्या सर्वाधिक ९१ धावा आहेत.

आयपीएल मधील कामगिरी
२०१४ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून राहुल तेवतियाला प्रथम आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. यानंतर त्याने पंजाबकडून पदार्पण सामन्यात १८ धावा देऊन दोन बळी घेतले होते. या व्यतिरिक्त त्याने याच सामन्यात ८ चेंडूत १५ धावा केल्या होत्या. त्यावेळी ठेवतियाला जास्त संधी मिळत नव्हती. परंतु २०१८ मध्ये दिल्ली संघात आल्यानंतर तो आणखी सामने खेळू लागला. पण तो चांगली कामगिरी करू शकला नाही.

सिक्सर किंग आहे राहुल तेवतिया
टी-२० मध्ये तेवतियाचा स्ट्राइक रेट १५३ आहे. कदाचित यामुळेच राजस्थान संघाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. सामन्यानंतर संजू सॅमसनने सांगितले की, तेवतिया एक असा फलंदाज आहे जो नेटवर बरेच षटकार मारतो आणि म्हणूनच संघ व्यवस्थापनाला माहित होते की, जर तो मैदानावर टिकून राहिला, तर षटकार मारण्याची हमी आहे. आणि तसेच झाले, त्याने ५ षटकार लगावत राजस्थानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.