IPL 2021 च्या लिलावाची तारीख जाहीर, जाणून घ्या कोठे, कधी आणि कोणत्या खेळाडूंचा लिलाव होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  यंदाच्यावर्षाचा आयपीएलचा लिलाव नेमका कुठे आणि कधी होणार याबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती जाहिर केली आहे. यावर्षी आयपीएलचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे होणार आहे. यावेळी तब्बल 139 खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या दिवशी सर्व संघाचे मालक आणि अधिकारी या लिलावात उपस्थित राहणार आहेत. तसेच कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेयचे हे ठरणार आहे. यामुळे यावर्षी आयपीएलच्या कोणत्या संघात कोणते खेळाडू असणार आहेत, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सर्व संघांना खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख 20 जानेवारी देण्यात आली होती. 4 फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंना एका संघातून दुसऱ्या संघात (ट्रेडिंग विंडो) जाता येणार आहे. बऱ्याच संघांनी आपल्या खेळाडूंना सोडचिठ्ठी दिल्याचे पहायला मिळत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्वीव्ह स्मिथ (राजस्थान रॉयल्स) आणि ग्लेन मॅक्सवेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंवर लिलावात किती बोली लागते आणि ते कोणत्या संघात जातात, याचे चित्र 18 फेब्रुवारीला स्पष्ट होईल.

जाणून घ्या कोणत्या संघाकडे किती पैसे आहेत

खेळाडूंना रिलीज केल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या खात्यात सर्वाधिक पैसे शिल्लक आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे 53.2 कोटी, रॉय चॅलेंजर्स बेंगळुरूकडे 35.70 कोटी, चेन्नई सुपरकिंग्जकडे 22.90 कोटी, राजस्थान रॉयल्स 34.85 कोटी, दिल्ली कॅपिटल 12.8 कोटी, सनरायझर्स हैदराबाद 12.8 कोटी, मुंबई इंडियन्स 15.35 कोटी, कोलकाता 10.85 कोटी रुपये शिल्लक आहेत.