Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं IPL रद्द ? 14 मार्चला होणार निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलवर कोरोनाव्हायरसचा मोठा धोका आहे. माहितीनुसार, आता राज्य सरकारही यासंदर्भात मोठी पावले उचलताना दिसत आहेत. याआधी कर्नाटक सरकारने सामन्यांचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्राने आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी तिकिटांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दरम्यान, याची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल 14 मार्च रोजी कोरोना व्हायरसमुळे बिघडलेल्या परिस्थितीसंदर्भात बैठक घेईल. या बैठकीत आयपीएल रद्द होणार की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.

परदेशी खेळाडूंच्या अडचणीत वाढ 
यावर्षी बीसीसीआयसाठी आयपीएलचे आयोजन कठीण होत आहे. व्हिसा धोरणात भारत सरकारने अलीकडेच केलेले बदल वाढत्या अडचणी दर्शवित आहेत. आयपीएल खेळण्यासाठी भारतात येणार्‍या 60 परदेशी खेळाडूंना व्हिसा मिळेल की नाही, यावर अद्याप परिस्थिती स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, बीसीसीआय रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल आयोजित करण्याचा विचार करीत आहे, मात्र अंतिम निर्णय बैठकीतच घेण्यात येईल.

कोरोना व्हायरसचा खेळांवर परिणाम 
चीनपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे जगातील एक लाखाहून अधिक लोक त्रस्त झाले आहेत. त्याच वेळी, सुमारे चार हजार लोकांचा बळी गेला आहे. त्याचा परिणाम पाहता आतापर्यंत अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काहींना पुढे ढकलण्यात आले आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर येथे आतापर्यंत 60 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.