पाकिस्तानचे फिरकीपटू अब्दुल कादीर यांचं निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी फिरकीपटू अब्‍दुल कादीर यांचे काल निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. जगभरात त्यांच्या गुगलीसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी पाकिस्तानसाठी 67 कसोटी सामने आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. पाकिस्तानसाठी ते 16 वर्ष क्रिकेट खेळले.

15 सप्टेंबर 1955 मध्ये लाहोरमध्ये जन्मलेल्या अब्दुल कादीर यांनी खेळलेल्या 67 कसोटी सामन्यांत 236 विकेट तर 104 एकदिवसीय सामन्यांत 132 विकेट घेतल्या. त्याचबरोबर पाच सामन्यांत त्यांनी पाकिस्तानचे कर्णधारपद देखील भूषविले. निवृत्तीनंतर त्यांनी समालोचन करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर पाकिस्तानच्या निवड समितीचे ते अध्यक्ष देखील होते. त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून दुःख व्यक्त करण्यात आले असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

गुगली मास्टर म्हणून ओळख
अब्दुल कादीर हे आपल्या गुगलीसाठी ओळखले जायचे. त्यांची गुगली भल्याभल्या फलंदाजांना चकवा देऊन जात असे. ते दोन पद्धतीने गुगली टाकत असल्याने त्यांची गुगली ओळखणे कठीण जात असे. त्यांना डान्सिंग बॉलर देखील बोलले जात असे. त्याचबरोबर त्यांनी अनेक वर्ष पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना देखील मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी पाकिस्तानसाठी 1983 आणि 1987 मध्ये दोन वर्ल्डकप खेळले.

You might also like