माधव आपटेंनी नियम बदलायला लावल्यानेच सचिन तेंडूलकर खेळू शकला क्रिकेट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. आपटे यांनी भारतासाठी केवळ 7 कसोटी सामने खेळले मात्र आपले संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी वाहून घेतले. वयाच्या सत्तर वर्षापर्यंत ते क्रिकेट खेळत होते. त्याचबरोबर अनेक युवा खेळाडूंना संधी मिळण्यासाठी त्यांनी क्रिकेटच्या नियमांत देखील बदल केले. त्यांच्यामुळेच सचिन तेंडुलकरला भारताकडून लवकर क्रिकेट खेळणे शक्य झाले. त्यांच्या एका निर्णयामुळे सर्वात जुना क्लब क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सचिन तेंडुलकरला जागा मिळाली.

माधव आपटे यांची कारकीर्द देखील फार मजेशीर राहिली आहे. आपले प्रशिक्षक विनू मंकड यांच्यासह डावाची सुरुवात त्यांनी केली. तसेच विजय हजारे जखमी आल्यामुळे त्यांना प्रथम श्रेणी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली.

विजय मर्चंट यांच्या जखमी होण्याचा फायदा
माधव आपटे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक लेग ब्रेक गोलंदाज म्हणून केली. कॉलेजमध्ये असताना ते आपले प्रशिक्षक विनू मंकड यांच्यासह सलामीला फलंदाजी करत. 1951 मध्ये रणजी सामन्यात मुंबई आणि सौराष्ट्रामध्ये सामना खेळवला जाणार होता. या सामन्यात सलामी फलंदाज विजय मर्चंट जखमी झाल्याने आपटे यांना पदार्पणाची संधी मिळाली. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 67 सामन्यांमध्ये 3 हजार 336 धावा केल्या होत्या.

70 वर्षांपर्यंत खेळले क्रिकेट
प्रथम श्रेणी सामन्यांमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर देखील त्यांनी मुंबईतील काँगो लीगमध्ये क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले. 1948 ते 2002 दरम्यान या स्पर्धेत त्यांनी जवळपास 5 हजार धावा बनवल्या.

सचिनसाठी बदलला नियम
1989 मध्ये माधव आपटे ज्यावेळी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी काही नियमांत बदल केल्याने सचिन तेंडुलकर याला वयाच्या 14 व्या वर्षी त्यांच्यामुळेच या क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे माधव आपटे नसते तर सचिन तेंडुलकरला इतक्या कमी वयात भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नसती.

Visit : Policenama.com