ऑटो चालवत असत मोहम्मद सिराजचे वडील, आता मुलानं घराबाहेर उभी केली BMW कार

पोलीसनामा ऑनलाईन : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऐतिहासिक विजय नोंदविला. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियामध्ये चमत्कार केला. वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, मोहम्मद सिराज (mohammed siraj) यांनी ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले. हा दौरा सिराजसाठी (mohammed siraj) खूप अविस्मरणीय आणि खास राहिला. हा दौरा सुरू होण्यापूर्वीच वडिलांनी जगाला निरोप दिला होता. असे असूनही, तो घरी परतला नाही आणि टीमसोबत राहिला आणि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवून घरी परतताच सिराजने स्वत:ला एक गिफ्ट दिले.

शुक्रवारी सिराजने स्वत:ला बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली. त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही बातमी उघड केली. सिराजने नवीन कारचा एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिराजचे वडील एकेकाळी ऑटो चालवत होते आणि आज मुलाने घराबाहेर बीएमडब्ल्यू कार उभी केली. मात्र, हा क्षण पाहण्यासाठी आज सिराजचे वडील त्यांच्यासोबत नाहीत.

वडिलांनी कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाही

सिराजचा जन्म हैदराबादमधील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता आणि त्याचे वडील ऑटो चालक होते. तथापि, ऑटो चालक असूनही वडिलांनी कधीही सिराजला काहीही कमी पडू दिले नाही. त्यांनी सिराजला चांगल्यातले चांगले स्पाईक्स आणून दिले. दिवसभर सिराज क्रिकेटचा सराव करत असे. एवढेच नाही तर तो रात्री देखील सराव करायला जात असे. अधिक सराव केल्यामुळे आईने त्याला बर्‍याच वेळा मारहाणही केली पण त्याची ही जिद्द त्याला आयपीएलमध्ये घेऊन गेली.