महेंद्रसिंह धोनीची काश्मीरमध्ये ‘पोस्टींग’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा धडाकेबाज खेळाडू महेंद्रसिंग धोनी लवकरच भारतीय सैन्यात भरती होणार आहे. तो ३१ जुलै रोजी काश्मीरमधील टेरिटोरियल आर्मीच्या १०६ पॅराशूट बटालियनमध्ये सामील होणार आहे. भारतीय सेनेने दिलेल्या माहितीनुसर लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंग धोनी हा ३१ जुलै ते १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत या बटालियनमध्ये सामील होणार आहे. बटालियनमध्ये सामील झाल्यानंतर धोनी गार्ड, पोस्‍ट ड्यूटी, पेट्रोलिंग यांसारखी कामे करणार. सैनिकांबरोबरच राहणार असून त्यांच्याबरोबर काम देखील करणार आहे.

धोनी याआधी देखील जम्मू काश्मीरला गेला असून २०१७ मध्ये तो जम्मूच्या बारामुल्लामध्ये गेला होता. त्यावेळी त्याने तिथे सैन्याबरोबर आयोजित क्रिकेट सामन्यात सहभाग घेतला होता. त्याचबरोबर त्यावेळी धोनी सैन्याच्या युनिफॉर्ममध्ये दिसला होता. धोनीला २०११ मध्ये सैन्यातील हा बहुमान देण्यात आला असून सैन्यात त्याला लेफ्टनंट कर्नल हि रँक देण्यात आली होती. धोनीचे सैन्याबद्दलचे प्रेम काही नवीन नाही. एका मुलाखतीत देखील त्याने आपल्याला सैन्यात भरती व्हायचे होते असे सांगितले होते. मात्र नशिबात वेगळेच लिहिले असल्याने धोनीने क्रिकेट रसिकांचे मोठ्या प्रमाणावर मनोरंजन केले.

दरम्यान, धोनीने दोन महिन्याची विश्रांती घेतली असून तो विंडीज दौऱ्यावर देखील गेला नाही. त्याचबरोबर त्याच्या निवृत्तीच्या चर्चा देखील जोर धरत होत्या. मात्र धोनी पुढील वर्षी होणाऱ्या ती-२० वर्ल्डकपपर्यंत निवृत्त होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.