Paytm नं लावली ‘रेकॉर्ड’ ब्रेक बोली, भारतीय क्रिकेटमध्ये मिळाला ‘हा’ मोठा अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील डिजिटल पेमेंट करणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या पेटीएमने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लिलावामध्ये बाजी जिंकून भारतीय क्रिकेट संघाच्या सामान्यांचा टायटल स्पॉन्सर बनण्याचा मान मिळवला आहे. पुढील चार वर्ष ते भारतीय संघाच्या भारतात होणाऱ्या प्रत्येक सामन्याचे टायटल स्पॉन्सर असणार आहेत.

पेटीएमची मालकी असलेल्या ‘वन 97 कम्यूनिकेशन्स प्राइवेट लिमिटेड’ या कंपनीने हे अधिकार मिळवले असून प्रत्येक सामन्यासाठी त्यांना बीसीसीआयला 3.80 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी देखील कंपनीने चार वर्षांसाठी हे अधिकार मिळवले होते.

बीसीसीआयने आपल्या माहितीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, 326.80 कोटी रुपयांची बोली लावली असून 2019-23 पर्यंत होणाऱ्या भारतातील सामन्यांसाठी टायटल स्पॉन्सर असून यावेळी लावण्यात आलेल्या बोलीमध्ये 58 टक्क्यांची वाढ झाली आहे.

टायटल स्पॉन्सर म्हणजे काय

भारतात होणाऱ्या कोणत्याही मालिकेला त्या कंपनीचे नाव देण्यात येते. तसेच 2023 पर्यंत कंपनीकडे हे अधिकार राहणार आहेत. समजा भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मालिका खेळवण्यात येत असेल तर तिचे नाव पेटीएम फ्रीडम सीरीज म्हणून घेण्यात येते.

पेटीएमने ड्रीम11 ला टाकले मागे

या लिलावात पेटीएमने ड्रीम11 ला मागे टाकत हा लिलाव जिंकला. प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयने 2.5 कोटी रुपये किंमत ठरवली होती. यामध्ये पेटीएमने 3.80 कोटी रुपयांची बोली लावत हा लिलाव जिंकला.