‘हिटमॅन’ रोहितची तुफानी फलंदाजी, तोडलं 22 वर्षापुर्वीचं वर्ल्ड ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने वेस्ट इंडिजविरुद्ध कटक मध्ये वन डे सामन्यात 9 धावा केल्यामुळे सनथ जयसूर्याचा 22 वर्षांचा रेकॉर्ड मोडला. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात जेसन होल्डरच्या चेंडू वर षटकार मारल्यानंतर रोहितने श्रीलंकेच्या जयसूर्याच्या सलामीवीर म्हणून एका वर्षात 2387 धावांच्या रेकॉर्डला मागे टाकले. जयसूर्याने 1997 मध्ये हे अद्भुत रेकॉर्ड केले होते.

गेल्या 22 वर्षांत कोणत्याही सलामीवीरने एका वर्षात इतक्या धावा आपल्या नावे केलेल्या नाहीत. कटक वनडे सामन्यापूर्वी रोहितच्या नावे 2379 धावा होत्या. कटक वनडे मध्ये रोहितने चौकारांसह आपले खाते उघडले. त्याने शेल्डन कोटरेलचे पहिले षटक काळजीपूर्वक खेळले आणि एकही धाव केली नाही. पण यानंतर त्याने आपल्या दुसर्‍या षटकातील पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. रोहितला दोन चेंडूंत पुन्हा चौकार मिळाला. जेसन होल्डरच्या चेंडूला त्याने षटकार मारत जयसूर्याचा 2387 धावांचा विक्रम मोडला आणि त्यास मागे टाकले.

रोहित शर्मापूर्वी वीरेंद्र सेहवागला जयसूर्याचा विक्रम मोडण्याची संधी होती. त्याने 2008 मध्ये 2355 धावा केल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 2003 मध्ये 2349 आणि सईद अन्वरने 1996 मध्ये 2296 धावा केल्या. रोहित शर्माने यापूर्वी 2019 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नोंदविला आहे.

2019 मध्ये रोहित’राज’
रोहित शर्मा यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषकात त्याने केवळ पाच शतके ठोकली नाहीत तर कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याच्या बॅटने कमाल केली आहे. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्येही त्याने द्विशतक झळकावले. टी -२० क्रिकेटमध्येही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाजांच्या यादीत रोहित संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध विशाखापट्टणम एकदिवसीय सामन्यात त्याने 159 धावांची खेळी केली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/