सचिन तेंडुलकरची 30 वर्ष : 16 वर्षाचा मुलगा, वेदना सहन करत रक्तानं माखलेल्या शर्टामध्ये खेळला अन् बनला क्रिकेटचा ‘बाहुबली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 वर्ष पूर्ण झाले. 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यांत पाऊल ठेवणाऱ्या सचिनने भलेही निवृत्ती स्वीकारली असली तरी त्याने आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पराक्रमांना गवसणी घातली. कसोटी आणि एकदिवसीय अशा क्रिकेटच्या दोन्ही प्रकारांत सचिनने विविध वर्ल्डरेकोर्ड केले. ज्या वयात लहान मुले आपली 10 वीच्या परीक्षेची तयारी करत असतात त्या वयात वाचन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. त्यावेळी तो अवघ्या 16 वर्षांचा होता.

पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच भूमीत पदार्पण करणाऱ्या सचिनने पहिल्याच डावात वकार यूनुस, वसीम अकरम, इमरान खान आणि अब्‍दुल कादिर यांसारख्या घातक गोलंदाजांचा सामना केला. पहिल्यांदाच खेळणाऱ्या सचिनला वकार युनूसच्या गोलंदाजीवर अपघात झाला. मात्र सचिनने मैदानातून माघार न घेता तसेच रक्ताने माखलेल्या शर्टसह खेळत राहिला. त्याने त्या डावात 15 धावा केल्या. या सामन्यात त्याने 24 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांच्या साहाय्याने 15 धावा केल्या. दुसऱ्या डावात मात्र त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये पदार्पण देखील पाकिस्तानविरुद्ध केले होते. पहिल्याच सामन्यात सचिनला केवळ 2 चेंडूंचा सामना करत खाते देखील खोलता आले नव्हते. भारताने हा सामना 7 धावांनी गमावला होता.

दरम्यान, सचिनने 2013 मध्ये ज्यावेळी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली त्यावेळी त्याने 200 कसोटी सामन्यांमध्ये 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या होत्या. यामध्ये 51 शतक आणि 68 अर्धशतकांचा समावेश होता. तर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या. यामध्ये 49 शतक आणि 96 अर्धशतकांचा समावेश होता. कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर याचा विक्रम आजदेखील अबाधित आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग असून त्याने 13378 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये कुमार संगकारा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 14232 धावा केल्या आहेत.

Visit : Policenama.com