‘मास्टर ब्लास्टर’सोबत पुन्हा वीरेंद्र सेहवाग ‘ओपनिंग’ करणार, ब्रायन लाराच्या टीम विरूध्द ‘या’ दिवशी होणार मॅच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर आहे. सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग यांची जोडी पुन्हा एकदा ओपनिंग करताना सर्वांना पहायला मिळणार आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू ज्या संघाच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत त्याचे नेतृत्व ब्रायन लारा करणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज खेळवली जाणार आहे. त्यात एकूण 11 सामने होतील. सीरीजची सुरुवात सचिन तेंडूलकर आणि ब्रायन लारा यांच्या संघाच्या सामन्यापासून होईल.

पहिल्या सामना 7 मार्चला संध्याकाळी 7 वाजता –
सचिन तेंडुलकरचा संघ टीम इंडिया लीजेंड्स आणि ब्रायन लाराचा संघ वेस्ट इंडिज लीजेंड्स यांच्यात 7 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगेल. गुरुवारी या मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. एकूण 11 सामने खेळवले जातील. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर या मालिकेचे कमिशनर आहेत आणि सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.

कुठे खेळवले जातील सामने –
या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार सामने पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघ स्टेडियम आणि चार सामने नवी मुंबईच्या महाराष्ट्र क्रिकेट संघ स्टेडियमवर खेळले जातील तर अंतिम सामना 22 मार्चला मुंबईच्या ब्रेबाॅर्न स्टेडियमवर खेळला जाईल. पुण्यात भारताच्या संघाचे 2 सामने होतील. यातील एक 14 मार्चला दक्षिण अफ्रिका लीजेंड्स आणि 20 मार्चला ऑस्ट्रेलिया लीजेंट्सच्या विरोधात खेळवले जातील. वानखेडे आणि डीवायपाटील स्टेडियममध्ये यजमान संघ एक-एक सामना खेळेल.

हे दिग्गज असतील सहभागी –
या सीरीजमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेचे काही मोठे क्रिकेटर सहभागी होतील, ज्यात तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, जहीर खान, ब्रयान लारा, शिवनारायन चंद्रपाल, ब्रेट ली, ब्रेट हॉज, जोंटी रोड्स, मुथैया मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान आणि अजंता मेंडिस सहभागी होतील. आयोजकांच्या मते या सीरीजचा उद्देश रस्ते सुरक्षेसंबंधित जागृकता निर्माण करणे हा आहे.