227 धावा देणारा गोलंदाज म्हणाला – ‘मी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – न्यूझीलंड दौर्‍यावर वनडे आणि टी -२० मालिकेत अत्यंत खराब गोलंदाजी करणाऱ्या शार्दुल ठाकूरने एक मोठे विधान केले आहे. शार्दुलने सांगितले कि, ‘टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्याची क्षमता त्याच्यात आहे आणि आगामी टी-२० वर्ल्ड कपमध्ये तो विराट अँड कंपनीला चॅम्पियन बनवेल.’ शार्दूल म्हणाला कि, ‘अर्थातच माझे लक्ष वर्ल्ड कपवर आहे. माझ्यातील सकारात्मकतेमुळे व माझ्यात असलेला आत्मविश्वास आणि आवड यामुळे संघाला विश्वविजेते बनविण्यात किंवा चांगली कामगिरी करण्यास मदत करू शकतो.

IPL पासून लयीत :
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५ सामन्यांत २१ बळी घेणारा शार्दुल ठाकूर मार्चच्या उत्तरार्धात सुरू होणाऱ्या आयपीएलपासून आपल्या लयीत येणार आहे. त्याने म्हटले कि, ‘निश्चितपणे आयपीएल महत्त्वाची आहे आणि आम्हाला त्यातून मिळणारा लय महत्त्वाचा असेल. श्रीलंकेविरुद्ध टी -२० मालिका असून आम्ही आयपीएलनंतर झिम्बाब्वेला जाणार आहोत. टी -२० वर्ल्ड कपपूर्वी आम्ही आशिया चषकातही खेळू. चेन्नई सुपर किंग्जच्या या खेळाडूने सांगितले की, “त्यामुळे आयपीएलमधून आपल्याला मिळणारी लय महत्त्वाची ठरेल आणि ती पुढेही चालू ठेवावी लागेल.” न्यूझीलंडच्या दौऱ्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, ‘मी याकडे शिकण्याचा एक अनुभव म्हणून पाहतो. मी माझ्या चुकांचा अभ्यास करेन आणि त्यांना शिकण्याचा अनुभव म्हणून घेईन. माझा न्यूझीलंडचा हा पहिलाच दौरा होता आणि इतर खेळाडूंच्या तुलनेत मी भारताकडून फारसे खेळलो नाही.

फलंदाजीबरोबरही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल
बॉलिंगबरोबर शार्दुल ठाकूरने फलंदाजी करूनही भारताला विजय मिळवून दिला आहे. यासंदर्भात विचारले असता तो म्हणाला की, शाळा व महाविद्यालयांतही त्याने फलंदाजीद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तो म्हणाला, ‘मला नेहमी वाटते की मी फलंदाजी करू शकतो आणि संघात उपयुक्त योगदान देऊ शकतो. मी जेव्हा जेव्हा शाळा, महाविद्यालय किंवा होम टीमसाठी खेळत असे तेव्हा माझी भूमिका बदलली नाही. आता मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. इथेही माझी भूमिका तशीच राहील. जेव्हा जेव्हा मी फलंदाजीला उतरतो तेव्हा मी परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो.

शार्दुल ठाकूरची न्यूझीलंडमधील कामगिरी
दरम्यान, शार्दुल ठाकूरने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २२७ धावा दिल्या होत्या. एकदिवसीय मालिकेत शार्दुल ठाकूरचा इकॉनॉमी रेट ८.०५ आहे, जो टी -२० मध्येही खराब मानला जातो. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही शार्दुल ठाकूरने बऱ्याच धावा दिल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात शेवटचा ओव्हर वगळता शार्दुल ठाकूरने अत्यंत खराब गोलंदाजी केली. टी-२० मालिकेत शार्दुलने ९.८१ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. ठाकूरला ८ विकेट्स मिळाल्या परंतु त्यामुळे अनेक सामने फसले.