6,6,4,4,6,6 शिवम दुबेनं तोडल्या ‘खराब’ गोलंदाजीच्या सर्व ‘सीमा’, एकाच षटकात दिल्या 34 ‘धावा’

माउंट माउंगानुई : वृत्तसंस्था- न्यूझीलंडविरूद्ध टी20 सीरीज टीम इंडियाने जिंकली असली तरी सत्य हे आहे की या सीरीजदरम्यान भारतीय गोलंदाजांनी अतिशय खराब गोलंदाजी केली. माउंट माउंगानुईमध्ये खेळल्या जात असलेल्या पाचव्या टी20 मॅचमध्ये टीम इंडियाचा गोलंदाज शिवम दुबेने खराब गोलंदाजीची हद्द ओलांडली. शिवम दुबेने न्यूझीलंडविरूद्ध पाचव्या टी20 मध्ये एका ओव्हरमध्ये 34 धावा दिल्या. शिवम दुबेच्या एका ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 4 षटकार आणि 2 चौकार मारले.

शिवम दुबेने 6 बॉलमध्ये 34 धावा दिल्या
रोहित शर्माच्या ठिकाणी कॅप्टन झालेल्या के. एल राहुलने शिवम दुबेला मॅचची 10 वी ओव्हर दिली. शिवम दुबेला पाहून न्यूझीलंडचा फलंदाज टिम सिफर्ट त्याच्यावर तुटून पडला, सिफर्ट आणि रॉस टेलरने मिळून शिवमची कशी धुलाई केली ते पाहुयात…

पहिला बॉल – शिवम दुबेने पहिला बॉल अतिशय खराब टाकला, जो सिफर्टने मिडविकेटला 6 रनसाठी फटकावला.

दुसरा बॉल – शिवम दुबेने दुसरा बॉल शॉर्ट टाकला जो सिफर्टने स्क्वेअर लेगला पुल केला. तेथे वॉशिंग्टन सुंदर उभा होता आणि तो बॉल पकडू शकला नाही. यामुळे बॉल 6 धावांकडे गेला.

तिसरा बॉल – शिवम दुबेच्या तिसर्‍या बॉलवर सिफर्टने चौकार ठोकला. बॉल अंगावर होता जो त्याने पॅडल स्कूप करू सीमारेषेच्या पलिकडे पाठवला.

चौथा बॉल – शिवम दुबेने ऑफ साईडच्या बाहेर बॉल टाकला ज्यावर एक धाव मिळाली.

पाचवा बॉल – शिवम दुबेने पाचवा बॉल नो बॉल टाकला, ज्यावर रॉस टेलरने चौकार ठोकला. त्याने डीप स्क्वेअर लेगवर बाऊंड्री मारली.

पाचवा बॉल – शिवम दुबेचा हा बॉल फ्री हिट होता, ज्यावर रॉस टेलरने षटकार मारला. या तर्‍हेने दुबेने 5 बॉलमध्ये 28 धावा दिल्या.

सहावा बॉल – शिवम दुबेच्या शेवटच्या बॉलवर सुद्धा रॉस टेलरने षटकार मारला. यावेळेला त्याने डीप स्क्वेअरकडे शॉट खेळून 6 धावा घेतल्या. अशा तर्‍हेने शिवम दुबेने एका ओव्हरमध्ये 34 धावा उधळल्या. 9 ओव्हरमध्ये न्यूझीलंडला स्कोअर 3 विकेटवर 64 धावा होता. परंतु, 10 व्या ओव्हरमध्ये त्यांचा स्कोअर 98 धावांवर पोहचला.

शिवम दुबेचा लाजिरवाणा रेकॉर्ड
एका ओव्हरमध्ये 34 धावा उधळण्यासोबत शिवम दुबे टी20 मॅचच्या एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा देणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याच्या अगोदर 2016 मध्ये वेस्टइंडीजविरूद्ध स्टुअर्ट बिन्नीने 32 धावा दिल्या होत्या. शिवम दुबे टी20 मध्ये एका ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा देणाच्या प्रकारात दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. 2007 टी20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने भारताविरूद्ध 36 धावा दिल्या होत्या.