सुरेश रैनाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया ; ‘इतके’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही महिन्यांपासून गुडघ्याच्या दुखापतीशी झगडणाऱ्या स्टार फलंदाज सुरेश रैना याच्या गुडघ्यावर आज शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया अ‍ॅमस्टरडॅम येथे झाली असून भारतीय क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली.

बीसीसीआयने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले होते की, ‘सुरेश रैना याच्या गुडघ्यावर अखेर शस्त्रक्रिया झाली. गेल्या काही महिन्यांपासून तो या समस्येवर झगडत होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्याला बरे होण्यासाठी दीड महिना इतका कालावधी लागेल.’ शस्त्रक्रियेमुळे आगामी मोसमात तो काही सामने खेळू शकणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले. घरगुती क्रिकेटचा हा हंगाम या महिन्याच्या शेवटी सुरू होणार असून रैना उत्तर प्रदेशच्या वतीने घरगुती क्रिकेट खेळतो. याशिवाय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व देखील तो करतो.

रैना बर्‍याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर जुलै २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तो अखेरचा खेळताना दिसला होता. रैना टीम इंडियाकडून १८ कसोटी, २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामने खेळला आहे. मात्र सध्या खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे तो संघाबाहेर आहे.

३२ वर्षीय रैनाला गेल्या हंगामापासूनच गुडघेदुखीचा त्रास होता. घरेलू सामन्यांचा विचार करता तो आयपीएल २०१८ मध्ये सीएसकेकडून अखेरचा खेळला होता पण हा हंगाम त्याच्यासाठी तितकासा चांगला ठरला नाही. त्याने १७ डावात १२२ च्या स्ट्राईक रेटने ३८३ धावा केल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त