MS धोनीवर भडकला ‘हा’ दिग्गज खेळाडू, म्हणाला – ‘संपलं याचं करिअर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुनील गावसकर यांच्यानंतर आता दिग्गज यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांनी माजी कॅप्टन एम एस धोनीबाबत क्रिकेटपासून लांब राहिल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले टीममध्ये परत येण्याबाबत धोनीने बाळगलेले मौन समजण्यापलीकडचे आहे. तसेच धोनीची ही पद्धत योग्य नसल्याचे देखील किरमानी यांनी सांगितले आहे. तो एक चांगला खेळाडू आहे मात्र सहा महिन्यांपासून का खेळत नाही याचे स्पष्टीकरण धोनीने द्यायला हवे असे देखील किरमानी त्यांनी सांगितले. वर्ल्‍डकप 2019 मध्ये न्यूझीलंड सोबत सेमीफायनल हारल्यापासून धोनी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरलेला नाही.

धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली
एका वृत्तवाहिनीशी बोलताना किरमाणी यांनी धोनीच्या कारकिर्दीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सध्या टीममध्ये चांगले विकेटकिपर असल्यामुळे धोनीला संघात स्थान मिळणार का ? असा प्रश्न विचारला असता धोनीचे मौन समजण्या पलीकडचे असल्याचे किरमानी यांनी सांगितले आहे. तसेच आता धोनी फक्त आयपीएल खेळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली असल्याचे मत किरमानी यांनी व्यक्त केले.

राहुलला किपर बनवण्यासाठी तयार नाहीत किरमानी
के एल राहुल बाबत किरमानी म्हणाले की, विकेटकीपिंग फलंदाज म्हणून भारताकडे पर्याय नाही. संघात ऋषभ पंत देखील आहे. या शिवाय दिनेश कार्तिक आणि वृद्धिमान साहा हेही हजर आहेत. विकेट कीपिंगसारख्या कार्याची जबाबदारी केवळ एका तज्ज्ञ खेळाडूवर सोपविली पाहिजे. किरमानी म्हणाले, राहुल हा सध्या विकेटकीपरची गरज पूर्ण करीत आहे हे खरे आहे परंतु हे त्याच्यासाठी आणि संघासाठी देखील धोक्याचेच आहे.

किरमानी म्हणाले राहुल संघासाठी मौल्यवान खेळाडू आहे आणि तो कोणत्याही क्रमवारीत खेळू शकतो. विकेटकिपरचे काम जोखमीचे असते त्यामुळे यात जर राहुल जखमी झाला तर संघासाठी हा मोठा फटका ठरेल असे स्पष्ट मत किरमानी यांनी व्यक्त केले आहे.