मोठा खुलासा ! सचिन तेंडुलकरला OUT केल्यानंतर धोक्यात पडला होता ‘या’ गोलंदाजासह ‘अंपायर’चा जीव, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. प्रत्येकजण या दिग्गज खेळाडूशी भावनिकरित्या जोडलेला असतो. सचिनने शतक ठोकल्यास देशात उत्सवाचे वातावरण असायचे आणि शतक गमावल्यानंतर प्रत्येक चाहता हा निराश व्हायचा. परंतु एक असे प्रकरण आहे जे की तुम्हाला अजून माहित नसेल, ते म्हणजे सचिनला बाद केलेल्या गोलंदाजाला आणि आउट देणाऱ्या अंपायरला जिवे मारण्याची धमकी दिली गेली होती.

इंग्लंड संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज टिम ब्रेस्नन (Tim Bresnan) ने असा दावा केला आहे की 2011 मध्ये कसोटी सामन्यात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला 100 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकण्यापासून रोखल्यानंतर त्याला व ऑस्ट्रेलियन अंपायर रोड टकरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ब्रेस्ननने म्हटले की 2011 च्या विश्वचषकात सचिनने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपले 99 वे शतक पूर्ण केले होते आणि ओव्हल येथे चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 91 धावांनी खेळत असताना टकरने त्याच्या चेंडूवर सचिनला एलबीडब्ल्यू करार दिले.

घराच्या पत्त्यावर पाठवण्यात आली धमकीची पत्रे

ब्रेस्ननने ‘यॉर्कशायर क्रिकेट: कव्हर्स ऑफ पॉडकास्ट’ दरम्यान सांगितले की तो चेंडू लेग साइडच्या बाजूने जात होता आणि ऑस्ट्रेलियाचे अंपायर टकरने सचिनला बाद म्हणून करार दिले. सचिन शतकाच्या अगदी जवळ होता. त्याने नक्कीच शतक ठोकले असते. परंतु तो बाद झाल्याने आम्ही मालिका जिंकली आणि जगातील प्रथम क्रमांकाचा संघ बनलो. तो म्हणाला, ‘आमच्या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली.’ यानंतरही कित्येकदा आम्हाला जिवे मारण्याची धमकी मिळतच राहिली. मला ट्विटरवर धमक्या आल्या आणि लोकांनी टकर यांच्या घराच्या पत्त्यावर धमकीची पत्रे पाठवली. त्या पत्रांमध्ये जीवे मारण्याच्या धमकीसोबतच लिहिले होते की तुम्ही त्यांना आऊट कसे दिले? चेंडू लेग साइडने बाहेर जात होता.

ब्रेस्नन याच्या म्हणण्यानुसार या धमक्या पाहता टकर यांना आपली सुरक्षा वाढवावी लागली. तो म्हणाला की काही महिन्यांनंतर ते मला भेटले आणि म्हटले की मित्रा, मला सुरक्षारक्षक ठेवावा लागला. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या घराभोवती पोलिस संरक्षण होते. यानंतर सचिन तेंडुलकरने 2012 च्या आशिया चषक स्पर्धेदरम्यान बांग्लादेशविरूद्ध शतक झळकावून आपली 100 शतके पूर्ण केली.