UAE : ‘फिक्सिंग’च्या आरोपाखाली 2 क्रिकेटपटू निलंबित, IPL होतंय तिथं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीगचे (IPL 2020) 13 वे सत्र युएईमध्ये संपन्न होणार आहे, दरम्यान त्याच देशातून खळबळजनक वृत्त समोर आले आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली युएईच्या दोन खेळाडूंना अमिराती क्रिकेट मंडळाने निलंबित केले आहे. आमिर हयात आणि अशफाक अहमद यांच्याविरोधात मंडळाने ही कारवाई केली आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी या दोन खेळाडूंना 2 आठवडे देण्यात आले आहेत.

आमिर हयात आणि अशफाक अहमद कोण आहेत ?
आमिर हयातचा जन्म पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झाला होता परंतु त्याने युएईसाठी क्रिकेट खेळले. हयातने युएईसाठी 9 एकदिवसीय सामने आणि 4 टी-20 सामन्यांमध्ये भाग घेतला. ज्यामध्ये हयातने एकदिवसीय सामन्यात 11 आणि टी-20 मध्ये 6 बळी घेतले आहेत.

अशफाक अहमदबद्दल बोलायचे झाले तर हा खेळाडू पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्माला आला असून त्याने युएईसाठी 16 एकदिवसीय सामने आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात या फलंदाजाने 21.50 च्या सरासरीने 344 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये 238 धावा केल्या आहेत. अशफाकच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 5 अर्धशतके आहेत.

अशफाक आणि आमिर हयात यांच्यावर काय आरोप आहेत
आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी 5 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हे दोन्ही खेळाडू दोषी आढळले आहेत. यांच्यावर पैसे किंवा भेट घेऊन सामन्याच्या निकालावर परिणाम करण्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. म्हणजे दोघांवरही फिक्सिंगचे खळबळजनक आरोप केले गेले आहेत. तपासणी दरम्यान हे दोन खेळाडू त्यांच्या पैशांची आणि भेटवस्तूंची माहिती देऊ शकले नाहीत.

मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळणे हे युएईच्या खेळाडूंसाठी फारसे नवीन नाही. गेल्या वर्षी युएईचे तीन खेळाडू फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते आणि त्यांना निलंबित करण्यात आले होते. मोहम्मद नवीद, शैमान अन्वर आणि कादर अहमद यांना भ्रष्टाचार कार्यात गुंतल्यामुळे आयसीसीने निलंबित केले होते.