वर्ल्डकप २०१९ : सामन्याबरोबरच विराटने ‘या’ कृतीमुळे जिंकली चाहत्यांची मने

ओव्हल : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मध्ये काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ३४ धावांनी  पराभूत करून या स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवला. या सामन्यात आपल्या खेळीने  चाहत्यांची आणि प्रेक्षकांची मने  जिंकणाऱ्या कोहलीने आपल्या आणखी एका कृत्याने चाहत्यांची मने जिंकली. विराट कोहली फलंदाजी करत असताना, भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ याला चीटर, चीटर म्हणण्यास सुरुवात केली. स्मिथचे हुटिंग पाहता विराट कोहलीनं भारतीय चाहत्यांना समज देत, स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात किंग कोहलीचे कौतुक होताना दिसून येत आहे.

मागील वर्षी बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टीव्ह स्मिथवर एका वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याने वर्ल्डकपद्वारे आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन केले होते. मात्र कालच्या सामन्यात त्याला भारतीय प्रेक्षकांनी चिडवण्यास सुरुवात केली. मात्र कर्णधार कोहलीने समजदारपणा दाखवत प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्याने स्मिथसाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले. या प्रसंगानं स्मिथही भारावून गेला, आणि त्यानं कोहलीशी हस्तांदोलन केले. दरम्यान सोशल मीडियावर देखील त्याच्या या स्पिरिटमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, या स्पर्धेत भारत आपला पुढील सामना १३ जून रोजी न्यूझीलंडविरोधात तर १६ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.