विराट कोहलीची मोठी कामगिरी, ICC नं दशकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून केली निवड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय कर्णधार विराट कोहलीला(Indian captain Virat Kohli) आयसीसीचा दशकाचा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटर आणि दशकाचा सर्वोत्कृष्ट एकदिवसीय पुरुष क्रिकेटर म्हणून निवडण्यात आले आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला दशकाचा सर्वोत्कृष्ट कसोटी पुरुष क्रिकेटर आणि अफगाणी फिरकी गोलंदाज राशिद खान यांना दशकाचा सर्वोत्कृष्ट टी -20 पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. त्याचवेळी माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दशकाचा क्रीडा कौशल्य पुरस्कार त्याला मिळाला आहे.

गेल्या 10 वर्षात कोहलीने केल्या 20 हजाराहून अधिक धावा

गेल्या दहा वर्षांत विराट कोहलीने कसोटी, टी -20 आणि एकदिवसीय सामन्यात 56.97 च्या सरासरीने 20,396 धावा केल्या आहेत. या दशकात त्याने 66 शतके आणि 94 अर्धशतके झळकावली आहेत. या दशकात वनडेमध्ये 10 हजारहून अधिक धावा करणारा कोहली हा एकमेव खेळाडू आहे. त्याने 61.83 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत त्याने वन डेमध्ये 39 शतके आणि 48 अर्धशतके झळकावली आहेत.

स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट कसोटीपटू आणि राशिद खान सर्वोत्कृष्ट टी -20 खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने गेल्या दहा वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये 65.79 च्या सरासरीने 7040 धावा केल्या आहेत. त्याने 26 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहेत. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खानने या दशकात टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 89 बळी घेतले आहेत. त्याची सरासरी 12.62 आहे. राशिदने चार वेळा तीन विकेट्स आणि दोनदा पाच विकेट्स केले.

धोनीला क्रीडा कौशल्य पुरस्कार
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमीच मैदानावर कुल राहण्यासाठी ओळखला जातो. आयसीसीने त्याला दशकातील बेस्ट स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार दिला आहे. 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी धोनीला हा पुरस्कार मिळाला आहे. नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात धावबाद होऊनही धोनीने इयान बेलला परत खेळण्यास बोलावले. आता आयसीसीने त्या खेळाच्या भावनेसाठी धोनीला हा सन्मान दिला आहे.

आयसीसी पुरस्कारांमध्ये अ‍ॅलिस पॅरीची धमाल
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट टीमची स्टार क्रिकेटर अॅलिस पॅरी यांना सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा दशकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिला दशकातील सर्वोत्कृष्ट महिला टी 20 आणि एकदिवसीय खेळाडू म्हणूनही निवडले गेले आहे.

आयसीसी दशकाचा कसोटी संघ:
अ‍ॅलिस्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन, विराट कोहली (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.

आयसीसी दशकाचा एकदिवसीय संघः
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, साकिब अल हसन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क, ट्रेंट बाउल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा.

दशकाचा आयसीसी टी -20 संघः
रोहित शर्मा, ख्रिस गेल, अ‍ॅरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, महेंद्रसिंग धोनी (कॅप्टन), किरोन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.