वीरेंद्र सेहवागच्या घरावर झाला मोठा ‘हल्ला’, स्वतः ‘वीरू’नं ‘व्हिडिओ’ शेअर करत दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग लॉकडाऊन दरम्यान आपल्या कुटुंबासमवेत घरी वेळ घालवत आहे. शनिवारी त्याने एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की त्याच्या घरावर हल्ला झाला आहे. सेहवागने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ सामायिक केला असून चाहत्यांना याबाबत माहिती दिली.

टोळ धाडीच्या विळख्यात सापडले सेहवागचे घर
गेल्या काही काळापासून उत्तर भारतातील जनता टोळ धाडीमुळे त्रस्त झाली आहे. हे टोळ किडे राजस्थानमधून पसरत ते आता दिल्लीत पोहोचले आहेत. सेहवागचे घर देखील त्यांच्या विळख्यात सापडल्याने त्याने तो व्हिडिओ शेअर केला आहे. सेहवागने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘टोळांचा हल्ला, थेट घरावर, #हल्ला’. सेहवागने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश टोळ किड्यांनी भरलेले दिसत आहे.

 

 

चाहत्यांनी सेहवागला सांगितले सुरक्षित राहण्याचे उपाय
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी लिहिले की सेहवागने आपली बॅट बाहेर ठेवावी, ते टोळ किडे स्वतःहून निघून जातील, तर काहींनी सेहवागला व्हिडिओ बनवण्याऐवजी घरातच सुरक्षित राहण्याची विनंती केली.

राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक भागात टोळांचा हल्ला झाल्याची नोंद झाली आहे, तर प्रशासनाने कीटकनाशक फवारणी करून त्यांना हाकलून लावण्याचा किंवा ठार मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान ही टोळ धाड गुरुग्राम आणि दिल्लीच्या काही सीमा भागात पोहोचल्यानंतर दिल्ली सरकारने सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट वर ठेवले आहे.