निवड समितीनं शोधला ऋषभ पंतला पर्याय, ‘हे’ तीन खेळाडू आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत त्याच्या खराब फलंदाजीमुळं टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहालीत पंत चुकीच्या पद्धतीने खेळला आणि विकेट गमावून बसला. त्यामुळे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जागी संधी देण्यात आलेल्या पंत याची आता विकेट दान करणारा खेळाडू म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आता नवीन विधान केल्याने ऋषभ पंत याच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रसाद यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले कि, आम्ही तीनही प्रकारांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना तयार करत आहोत. त्याचबरोबर आम्ही पंत याच्या खेळावर देखील लक्ष ठेवून आहोत. आमच्याकडे केएस भरत असून त्याने भारतीय अ संघासाठी चांगले प्रदर्शन केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी ईशान किशन, संजू सॅमसन यांचीदेखील नावे यावेळी घेतली. मात्र त्याचबरोबर त्यांनी हेदेखील सांगितले कि, त्यांचा ऋषभ पंत याच्यावर विश्वास असून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यालाच पहिले प्राधान्य राहणार आहे. ऋषभ याच्या बाबतीत भारतीय क्रिकेटला धैर्य राखण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटले. पंत हा प्रतिभावान खेळाडू असून त्याने आपल्या खेळात वैविध्य आणल्यास तो आणखी शानदार खेळाडू देखील बनू शकत असल्याचे प्रसाद यांनी म्हटले.

दरम्यान, ऋषभ पंत याने भारतीय संघासाठी आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले असून तो अनेक वेळा मोक्याच्या क्षणी बाद झाला आहे. त्यामुळे धोनीच्या जागी त्याला संधी मिळाल्याने त्याच्याकडून क्रीडा रसिकांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. त्यामुळे धोनीच्या तोडीसतोड खेळ करण्यासाठी त्याच्यावर सध्या दबाव येत आहे. महेंद्रसिंह धोनी देखील अद्याप निवृत्त झाला नसून टी-20 वर्ल्डकपमध्ये धोनीच्या खेळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता ऋषभ पंत याच्यावर चांगले खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे.

Visit – policenama.com