चेतेश्वर पुजाराच्या जागी BCCI ने रोहित शर्माला बनविले कसोटी संघाचा उपकर्णधार, जाणून घ्या कारण…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने रोहित शर्माला चेतेश्वर पुजाराच्या जागी बॉर्डर -गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून नेमले आहे. रोहित शर्मा भारतीय वनडे आणि टी -20 संघाचा उपकर्णधारही आहे. कर्णधार विराट कोहली पॅटर्निटी लीव्हवर भारतात परतल्यानंतर अजिंक्य रहाणेला संघाचा कार्यकारी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आणि मेलबर्न येथे खेळल्या जाणार्‍या बॉक्सिंग डे कसोटीत पुजाराला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

यामुळे रोहित शर्मा बनला उपकर्णधार
रोहित शर्मा नियमित सलामीवीर म्हणून फक्त पाच कसोटी सामने खेळला असून नोव्हेंबर 2019 पासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. असे असूनही रोहित शर्माला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. पीटीआयच्या अहवालानुसार टीम मॅनेजमेंटने आधीच निर्णय घेतला होता की जर रोहित तंदुरुस्त होऊन संघात सामील झाला तर तो उपकर्णधार होईल.

या प्रकरणाशी संबंधित बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य कर्णधार झाल्यानंतर भारतीय संघाच्या उप-कर्णधार बाबत कोणतीही शंका नव्हती. तिथे नेहमी रोहितचा होता आणि पुजाराला ही जबाबदारी रोहित संघात परत येईपर्यंत देण्यात आली होती. या अधिकाऱ्याने सांगितले की, रोहित मर्यादित षटकांच्या स्वरूपात भारतीय संघाचा उपकर्णधार होता. अशा परिस्थितीत हे स्पष्ट आहे कि, विराटच्या अनुपस्थितीत तो संघाच्या नेतृत्व गटाचा भाग असेल.

रोहित शर्माने सुरू केला सराव
रोहित शर्माने मेलबर्नमध्ये सराव सुरू केला आहे. दरम्यान, रोहित शुबमन गिलसह डावाची सुरुवात करेल कि मधल्या फळीत खेळेल याबाबत माहित नाही. जर तो सलामीवीर म्हणून खेळला तर खराब लयीत असणारा मयंक अग्रवाल संघातून बाहेर पडेल आणि मध्यक्रमात खेळल्यास हनुमा विहारीला अंतिम 11 मधून बाहेर पडावे लागेल. रोहितने 32 कसोटी सामन्यांमध्ये 46 च्या सरासरीने 2141 धावा केल्या आहेत. भारतीय संघ 5 जानेवारीला सिडनीला रवाना होईल.