पुन्हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार ! 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार T-20 स्पर्धा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात हैदोस घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे सुमारे दोन महिन्यांहून अधिक काळ बंद असलेले क्रिकेट प्रेक्षकांच्या उपस्थितीत पुन्हा सुरू होण्याची चिन्हे आहेत. ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे जून महिन्यात टी 20 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्याआधी काही फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या, पण त्या स्पर्धा विनाप्रेक्षक होत्या. पण या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्यात येणार आहे. सीडीयू टॉप एंड टी 20 नावाची ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येणार आहे.

राणीच्या वाढदिवसानिमित्त 6 ते 8 जून या कालावधीत ही क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे. कोरोना व्हायरसच्या तडाख्यानंतर अनेक ठिकाणी फुटबॉल आणि छोटेखानी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पण या सर्व स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी नव्हती. सीडीयू टॉप एंड टी 20 स्पर्धेत मात्र सुमारे 500 प्रेक्षकांना सामन्याच्या ठिकाणी जाऊन क्रिकेट पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील विभागात 21 मे पासून आतापर्यंत करोनाचा एकही रूग्ण आढळला नसल्याने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

डार्विन प्रीमियर ग्रेड क्लबचे सात संघ आणि उत्तरेकडील विभागातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेला एक संघ असे आठ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडन यांच्यात 13 मार्च रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवण्यात आला. तो सामनादेखील प्रेक्षकांविना खेळला गेला होता. त्या सामन्यानंतर अद्याप कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवण्यात आलेला नाही. पण आता मात्र क्रिकेट हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.