जेलमधुन सुटलेल्या गुन्हेगाराचा देहुगावात खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खुनाचा प्रयत्न, मारामारी सारख्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगातून दोन दिवसांपूर्वी सुटलेल्या गुन्हेगारावर धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय ३८, रा. माळवाडी, देहुगाव, ता, हवेली) असे त्याचे नाव आहे. ही घटना देहुगाव येथील एच डी एफ सी बँकेसमोरील रस्त्यावर शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी ३ ते ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अमोल विजय बाळसराफ (वय २४, रा. माळवाडी, देहुगाव) यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शंकर बाळसराफ याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, मारामारी करणे असे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. दोनच दिवसापूर्वी त्याची तुरुंगातून जामीनावर सुटका झाली होती.

त्यानंतर शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास तो देहुगावातील एच डी एफ सी बँकेच्या ए टी एम समोरील रोडवर उभा असताना तीन ते चार जणांनी त्याच्या चेहऱ्यावर, गळ्यावर व कपाळावर धारदार शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो तेथे पडल्यावर हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे घोषित केले. बाळसराफ याचा खून पूर्ववैमनस्यातूनच झाला असल्याचा पोलिसांना संशय असून सहायक पोलीस निरीक्षक पठाण अधिक तपास करीत आहेत.