विमानतळावरुन 6 किलो सोन्याची बिस्किटे जप्त !

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन  –   सध्या कोरोनाचा जोर देशात वाढत आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशभरात कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरळीत असतानाही नियमांचे पालन बंधनकारक आहे. मात्र, या कडक निर्बंधातही चेन्नई विमानतळावरुन सोन्याची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.

तब्बल ६ किलो सोनं तामिळनाडूतील चेन्नई विमानतळावरुन जप्त करण्यात आलं आहे. पांढऱ्या चिकट टेपच्या सहाय्याने ही सोन्याची बिस्कीटे गुंडाळण्यात आली होती. दुबई ते चेन्नई या प्रवासादरम्यान ही सोन्याची तस्करी करण्यात येत होती. विमानातील सीटच्या कुशनखाली सोन्याची बिस्कीटे लपविण्यात आली होती. येथील कस्टम विभागाला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रवाशावर वॉच ठेऊन ही कारवाई केली.

प्रत्येक बिस्कीटाचे वजन १ किलो आहे तसेच कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोन्याची ६ बिस्कीटे जप्त केली. एकूण ६ किलो वजनाचे ही सोन्याची बिस्कीटे असून त्यांचे बाजारमुल्य २.९० करोड रुपये आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हे सोने जप्त केले असून आरोपीस ताब्यात घेतले आहे.