ठाण्यात शिवसेना-भाजप वाद चिघळला; BJP च्या 17 नगरसेवकांविरुद्ध FIR

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही महापालिकेच्या ऑनलाइन महासभेच्या वेळी सभागृहाबाहेर जमाव जमवून ऑफलाइन महासभा घेण्याच्या मागणीकरिता आंदोलन केल्याबद्दल भाजपच्या 17 नगरसेवकांविरुद्ध शुक्रवारी (दि. 19) गुन्हा दाखल केला आहे. तसेच भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी पादचारी पुलांच्या उभारणीवरून शिवसेनेवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांकरिता शिवसेनेने त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला आहे.

गटनेते मनोहर डुंबरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मनेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नंदा पाटील, आशा शेरबहादूर सिंह, नारायण पवार, स्नेहा आंब्रे, दीपा गावंड, अशोक राऊळ असे गुन्हा दाखल झालेल्या भाजपा नगरसेवकांची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप गटनेते डुंबरे यांच्या दालनात घुसून निदर्शने केल्याबद्दल भाजपने शिवसेनेच्या सात नगरसेवकांसह 40 पदाधिकाऱ्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता शिवसेनेनेही नोव्हेंबर महिन्यातील महासभेच्या वेळी जमाव जमवून आंदोलन केल्याबद्दल भाजपच्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कोरोनाची परिस्थिती असल्याने जमाव करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आदेश असतानाही या नगरसेवकांनी त्याचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान गटनेते मनोहर डुंबरे म्हणाले की, हे सुडाचे राजकारण आहे. आम्ही ज्यावेळी हे आंदोलन केले होते. तेंव्हा कोरोनाचे रुग्ण कमी आढळत होते, त्यामुळे नियमात शिथिलता लागू केली होती. त्यावेळी इतर कार्यक्रमांना 200 ते 300 लोक जमत होते. नोव्हेंबरमध्ये केलेल्या निदर्शनांकरिता आता तक्रार करणे अयोग्य आहे. आतापर्यंत सत्ताधारी शिवसेना झोपली होती का ? अब्रुनुकसानीच्या दाव्याला आम्ही न्यायालयात उत्तर देऊ असे ते म्हणाले.