धक्कादायक ! चुकीचे इंजेक्शन दिल्याने बाळ-बाळंतिणीचा मृत्यु ; पुण्यातील ३ डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केले असताना चुकीच्या गोळ्या आणि इंजेक्शन, सलाइन दिल्याने त्यात बाळ आणि बाळंतिणीचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाकण येथील अरगडे हॉस्पिटलचे डॉ. अरगडे, क्रिटीकेअर हॉस्पिटलचे डॉ. घाटकर आणि डॉ. सुपेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चाकणमधील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये ९ मे रोजी रात्री अकरा वाजता घडला आहे.

याप्रकरणी सुधीर मच्छिंद्र पवळे (वय ३०, रा. शिक्रापूर) यांनी फिर्याद दिली आहे. पवळे यांनी त्यांची पत्नी सपना यांना बाळंतपणासाठी चाकण येथील अरगडे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. अरगडे यांनी दिलेले इंजेक्शन, गोळ्यांमुळे सपना यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना घाटकर यांच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येऊन डिलिव्हरी करण्यात आली. मात्र, बाळ मुलगी मृत झाली होती. त्यानंतर सपना यांची तब्येत गंभीर झाली. त्यामुळे त्यांनी सपना यांना चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये पाठविले. तेथे डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांविरुद्ध सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.