मीरारोड : कोविड रूग्णालयात घुसून डॉक्टरांसह इतरांना शिवीगाळ; YouTube चॅनल चालवणार्‍यासह 8 जणांविरूध्द FIR

मीरारोडः पोलीसनामा ऑनलाइन – मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रमोद महाजन कोविड उपचार केंद्रात घुसून डॉक्टरांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणा-या तसेच धमकी देऊन गोंधळ घालणाऱ्या एका युट्यूबवर चॅनल चालवणाऱ्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि. 14) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

आफताब खान, इम्तियाज खान यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डॉ. गौतम टाकळगावकर यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेने भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक वसाहतीमध्ये प्रमोद महाजन सभागृहात कोविड केंद्र सुरु केले आहे. येथे 206 बेड्सची मर्यादा आहे. मात्र सध्या रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने उपचार केंद्रात जागा शिल्लक नाही. त्यामुळे रुग्णास अन्यत्र न्यावे लागते. बुधवारी रात्री 8 च्या सुमारास युट्युबवर चॅनल चालवणारा आफताब खान आणि इम्तियाज खान व अन्य 6 ते 7 जण एका रुग्णाला घेऊन जबरदस्तीने रुग्णवाहिकेसह कोविड सेंटरच्या आवारात शिरले. त्यावेळी कर्तव्यावरील डॉक्टर गौतम टाकळगावकर, डॉ.छटपार, डॉ. नितीन जाधव आदीनी रुग्णवाहिकेतील रुग्णाची तपासणी सुरु केली. मात्र रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे आफताबसह त्याच्या साथीदारांनी उपचार केंद्रात आणि डॉक्टरांच्या कार्यालयात घुसून गोंधळ घातला. तसेच आफताबने डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ व धमकी दिली. त्यांनी मास्क सुद्धा घातलेला नव्हता. डॉक्टरांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी आफताबसह त्याच्या साथीदारवर गुन्हा दाखल केला आहे.