भाजप अध्यात्मिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तुषार भोसलेंसह 9 जणांवर FIR

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आध्यात्मिक आघाडीने दार उघड उद्धवा, दार उघड म्हणत राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा तुळजाभवानी मंदिर परिसरात आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले (tushar-bhosale) यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे शासकीय आदेशाचे पालन न करणे, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी भोसले यांच्यासह जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्यासह 9 जणांवर गुन्हे (crime-against-9-persons) दाखल केले आहेत.

यामुळे प्रशासन व भाजप अध्यात्मिक आघाडीचे आंदोलक यांच्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर तुळजापूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून तुळजापुरात कालपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तरीही हे आंदोलन सुरु केले आहे. राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.

काय म्हणाले तुषार भोसले?
साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्र पाठवली. पण हे सरकार झोपल्याचे सोंग करत आहे. अशी टीका तुषार भोसले यांनी केली. भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

राज्य सरकारनं सिनेमागृह, जलतरण तलाव आदींना परवानगी दिली. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार यापूर्वीच सुरु झाले आहेत. अशावेळी राज्यातील मंदिरे बंद का ? असा सवाल भाजप, विविध मंदिर समित्या आणि राज्यभरातील साधू-महंतांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभर थाळीनाद आंदोलन केले होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून मंदिरे सुरु करण्याची भाजपची मागणी मान्य केली नाही.

आ. मिटकरीचा तुषार भोसलेंवर हल्लाबोल
साधूसंत सरकार पाडतील, साधूसंत म्हणजे नेमके कोण?, ते आंदोलन करणारे भोसले स्वतःला साधूसंत म्हणवून घेत आहेत. मग साधूसंतांची नक्की व्याख्या कोणती? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थितीत केला आहे. आमदार मिटकरी यांनी ट्वीट करून भाजपवर निशाणा साधला आहे. जातीय द्वेष पसरवणे ही साधुसंतांची व्याख्या असते का? वारकरी समाज हा साधाभोळा समाज आहे. हा वारकरी समाज विठ्ठल सांप्रदायाला प्रमाण मानतो, इथे तुकोबारायांची, ज्ञानेश्वरांची, चोखोबारायांची परंपरा आहे. वारकरी सांप्रदाय जातीय द्वेष शिकवत नाही, असे देखील मिटकरी यांनी म्हटले आहे.