Pune News : भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात FIR दाखल, चाकू दाखवून मारहाण केल्याचा आरोप, गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलिसांकडे वर्ग

पुणे : भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध चाकूचा धाक दाखवत धमकाविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा विद्या प्रसारक मंडळ ताब्यात देण्यास नकार दिल्याने मारहाण करुन मानेला चाकू लावून धमकाविल्याचा प्रकार ३ वर्षांपूर्वी पुण्यात घडला होता. रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात अ‍ॅड. विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यात गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचा ताबा मिळविण्यासाठी तानाजी भोईटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने जानेवारी 2018 रोजी पुण्यात बोलावून घेतले. त्यानुसार ते महेश पाटील यांना घेऊन कोथरुडमधील एका हॉटेलमध्ये गेले होते. तेथे तानाजी भोईटे, वीरेंद्र भोईटे व इतर थांबलेले होते. तेथे तानाजी भोईटे यांनी मविप्र ही संस्था गिरीश महाजन यांना हवी आहे. त्यासाठी ते एक कोटी रुपये द्यायला तयार आहे, असे सांगितले. नीलेश याने गिरीश महाजन यांना व्हिडिओ कॉल केला व अ‍ॅड. विजय पाटील यांना बोलायला लावले. तेव्हा महाजन यांनी सर्व संचालकाचे राजीनामे घे व संस्था नीलेशच्या ताब्यात दे, असे सांगितले. त्यानंतर सर्व जण सदाशिव पेठेतील एका अपार्टमेंटमध्ये आले. तेथे आधीच जयवंत भोईटे, नीळकंठ काटकर, सुनील झंवर व इतर थांबले होते. रामेश्वर नाईकने मानेजवळ चाकू लावून मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. कोथरुड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मराठा विद्या प्रसारक मंडळाची 2015 मध्ये निवडणुक होऊन त्यात नरेंद्र भास्करराव पाटील यांच्या गटाने सर्व 18 जागा मिळविल्या होत्या. तेव्हापासून मराठा विद्या प्रसारक मंडळावर पाटील गटाच्या ताब्यात होती. त्यानंतर भोईटे गटाने धर्मादाय कार्यालयातील नोंदणीचा आधार घेत संस्था आपल्या ताब्यात घेतली होती.

या गुन्ह्याची न्यायालयामार्फत चौकशी करावी़ राजकारणातील हा गलिच्छ प्रकार असून अ‍ॅड. विजय पाटील यांचा बोलवता धनी वेगळा असल्याचे आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.