आणेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करणाऱ्या चोरगेचा साथीदार गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आणेवाडी टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांवर गोळीबार करत जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी फरार असलेल्या कुख्यात रोहिदास चोरगे याच्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या युनीट १ च्या पथकाने अटक केली आहे.

सुमीत रमेश धुमाळ (वय. ३२ वर्षे, राजीव गांधी नगर बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

आणेवाडी टोल नाक्यावर २५ मार्चच्या मध्यरात्री एकच्या सुमारास बुथ क्रमांक एकवर टोल न भरता एक कार तशीच पुढे दामटली. त्यानंतर पळून जाणाऱ्या या कारला टोल बुथवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अडवून धरले. या दरम्यान लागलीच त्यांच्या पाठीमागून फॉर्च्यूनर कार आली. या गाडीतील पाच ते सहा जणांसोबत असलेल्या रोहिदास उर्फ बापू चोरगे याने त्यांच्याशी वाद घालत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. त्यानंतर त्यानंतर कर्मचारी जीव वाचविण्यासाठी पळू लागले. तर एका कर्मचाऱ्याला त्याने आणि त्याच्या साथीदारांनी पकडून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना भुईंज पोलिसांनी अटक केली आहे. परंतु रोहिदास चोरगे याच्यासह ६ ते ७ जण फरार आहेत.

दरम्यान गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत होते. तेव्हा या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सुमीत घुमाळ नावाचा तरुण भारती विद्यापीठच्या बँकेच्या गेटजवळ असलेल्या चायनीजच्या दुकानावर आला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

देवदर्शनाला गेल्यावर केला टोलनाक्यावर वाद

त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारणा केल्यावर त्या दिवशी घडलेली घटना त्याने सांगितली. तो आणि कुख्यात गुंड रोहिदास चोरगे, सोपान चोरगे, लक्ष्मण लेकावळे, हरगुडे आणि इतर काही जण मिळून मित्रांच्या गाड्यांमधून कोल्हापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी परत पुण्याला येताना आणेवाडी टोलनाक्यावर टोल भरण्यावरून कर्मचाऱ्यांशी वाद झाले. त्यानंतर रोहिदास चोरगेने गोळीबार केला आणि इतरांनी मारहाण केली आणि तेथून पोबारा केला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण वायकर, कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, वैभव स्वामी, अनिल घाडगे, बाबा चव्हाण, योगेश जगताप यांच्या पथकाने केली.