रात्रीच्या वेळी खिडकी उघडून चोऱ्या करणारा सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रात्रीच्या वेळी घराच्या खिडक्या उघडून मोबाईल, लॅपटॉप, सोने, इतर वस्तू चोरी करणाऱ्या एका सराईताला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ गुन्हे उघडकिस आणत दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चंद्रकांत बापू साळवे (वय. २९, रा, कोरेगाव भीमा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साह्याने मोबाईल, लॅपटॉप, सोने, व इतर वस्तू चोरी होत होत्या. याप्रकरणी २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट ४ च्या पथकाकडून तपास सुरु होता. त्यावेळी पोलीस कर्मचारी अब्दूलकरीम सय्यद आणि सचिन ढवळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार चंद्रकांत बापू साळवे हा चोरी करत असून तो लॅपटॉप विक्रीसाठी येणार आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दोन्ही गुन्हे कबूल केले. त्याच्याकडून लिनोव्हो कंपनीचे २ लॅपटॉप, १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, २ मोबाईल असा १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करणयात आला.

मुलीच्या शिक्षणासाठी हप्त्यावर लॅपटॉप
चंदननगर भागातील एका इमारतीत रखवालदार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने मुलीला शिक्षणासाठी हप्त्यावर लॅपटॉप घेऊन दिला होता. त्याने सुरुवातीचे केवळ २ च हप्ते भरले होते. मात्र साळवे याने घराची खिडकी उघडून मुलीचा लॅपटॉप चोरला होता. तर दुसऱ्या प्रकारात रात्रभर ऑफिसचे काम करण्यासाठी अभियंत्याने घरी आणलेला लॅपटॉप चोरून नेला. लॅपटॉपमध्ये अभियंत्याची संकलित केलेली महत्वाची माहिती होती. त्याला दुसऱ्या दिवशी कंपनीत या माहितीचे सादरीकरण करायचे होते. साळवे याच्यावर यापुर्वी विमाननगर, येरवडा, पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, कर्मचारी अब्दूलकरीम सय्यद, गणेश साळुंके, सचिन ढवळे, शंकर पाटील, राजू मचे, भालचंद्र बोरकर, हनुमंत बोराटे, रमेश साबळे, अतुल मेंगे यांच्या पथकाने केली.