खडकीतील खुनातील मुख्य आरोपी आठ तासात गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खडकी बाजार येथे बंगल्यात एकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावत खून करणाऱ्यांना ८ तासाच्या आत अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी एकाच्या आत्यासोबत असलेल्या नात्याला विरोध असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

गोपाळ अर्जून कांबळे (३२, खडकी) असे खून झालेल्याचे नाव आहे. राजेश राजू स्वामी (२४), सागर अशोक उंबरकर (२४) आणि धीरज गोपाळ गवळी (२४, खडकीबाजार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकऱणी खडकी पोलिसांनी राधा स्वामी, रेणूका परदेशी या दोघींना अटक केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी महिलेने गोपाळ कांबळे याला आपला मुलगा मानले होते . गोपाळ कांबळे हा त्यांच्यासोबतच खडकी येथे राहत होता. ही बाब फिर्यादी महिलेचा भाचा सागर उंबरकर याला आवडत नसल्याने त्याचा त्याला विरोध होता. त्यामुळे गोपाळचे सागर व त्याच्या नातेवाईकांसोबत वारंवार भांडणं व्हायची . दरम्यान बुधवारी दुपारी साडेतीन वाजता गोपाळ व फिर्यादी महिला हे दोघे बंगला नं २२ येथे रिना गाडेकर यांच्या घरी बर्फ आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी राधा स्वामी व रेणूका परदेशी यांनी त्यांच्याकडे पाहून त्यांच्या संबंधांवरून मस्करी केली. त्यावरून त्यांच्यात वादही झाला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास रेणूका परदेशी व राधा स्वामी यांनी त्यांच्या घराजवळ येऊन गोपाळला शिवीगाळही केली होती. त्यानंतर या सर्व प्रकाराबद्दल सागर उंबरकर याला समजले. तेव्हा तो त्याचा मेव्हणा राजेश स्वामी त्याची बहिण राधा स्वामी, मित्र धिरज गवळी, त्याची मैत्रिण या सर्वांनी मिळून वाढदिवस साजरा करण्याच्या आणि दारू पिण्याच्या बहाण्याने गोपाळ कांबळे याच्या घरी जाऊन त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून दगडाने मारहाण करून त्याचा खून केला.

याप्रकऱणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनीट ४ कडून याचा तपास केला जात होता. तेव्हा पोलीस हवालदार राजू मचे व पोलीस नाईक गणेश काळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, खुनातील पाहिजे असलेले तिघे चिंचवड येथे बिजलीनगर परिसरात आले असून तेथून ते बाहेरगावी जाण्याच्या तयारीत आहेत . त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन सापळा रचला. मात्र पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले . तेव्हा पाठलाग करून त्यांना पकडले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे , पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे , सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस हवालदार राजू मचे, गणेश काळे, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली.