‘खडकी’च्या CEO ची बनावट सही करून तरूणांना खोटी नियुक्ती पत्र देत लाखो रूपये उकळणार्‍या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकी छावणी परिषदेच्या सीईओंचे बनावट सही करुन तरुणांना खोटी नियुक्ती पत्र देत लाखो रुपयांची रक्कम उकळणाऱ्या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. त्यांनी दोन तरुणांना फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

अवधूत तुकाराम काशिद (रा. कडलस, सांगोला), दयानंद दामोदर जाधव (वय ३३, रा. कचरेवाडी, मंगळवेढा), भारत कृष्णा काटे (वय ३९, रा. राजोरी, सांगोला) व प्रमोद भगवान गुरव (वय २४, रा. उलवे, नवी मुंबई, मूळ-उंद, कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

खडकी छावणी परिषदेसाठी हेल्पर पदासाठी तरुणांना नोकरी असल्याचे सांगत या चौघांनी तरुणांचा विश्वास संपादन केला. त्या तरुणांना ऑर्डर दाखवत सीईओंची बनावट सही करुन त्यांच्याकडून प्रत्येकी 3 लाख रुपये असे एकूण 6 लाखांची फसवणूक केली. पंरतु तरुण ऑर्डर घेऊन गेल्यानंतर त्यांना फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर खडकी छावणी परिषदेचे सीईओ प्रमोद कुमार सिंह यांनी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची भेट घेतली. तसेच त्यांच्याकडे तक्रार केली. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास सुरु असताना गुन्हे शाखेला या चौघांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर अवधूत, दयानंद, भारतला ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्यातील मुख्य आरोपी दयानंद जाधव हा असून, त्याने बनावट ऑर्डर बनविल्याचे निष्पन्न झाले. दयानंद व प्रमोदने आणखी चार तरुणांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसविले असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधितांकडून नोकरीच्या आमिषाने राज्यातील विविध भागातील तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली जात आहे.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, सुनील पवार, शंकर पाटील, रमेश राठोड, सुरेंद्र साबळे, सुहास कदम यांच्या पथकाने केली.