ग्राईडर गे चॅट विवाहीत तरूणाला भेटण्यास बोलावून लुटणार्‍यांपैकी मुख्य आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – ग्राईडर गे चॅट अ‍ॅपवरून विवाहित तरुणाला भेटण्यास बोलवत त्याला लुटणाऱ्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला होता.

जतीन संतोष पवार (वय 18, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत 34 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती.
फिर्यादी हे धायरी परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा विवाह देखील झाला आहे. त्याने काही दिवसांपुर्वी गे चॅट अ‍ॅप डाउनलोड केले होते. ९ ऑगस्ट रोजी या अ‍ॅपवर चॅट करताना एका रवी नावाच्या मुलाने फिर्यादी तरुणाला रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानुसार त्यांचे चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर रवीने फिर्यादी तरुणाला पत्ता देउन नांदेड फाटा परिसरातील एका खोलीवर बोलाविले. त्यानुसार फिर्यादी तरुण चव्हाणनगरमधील असणाऱ्या रूमवर गेला. त्याठिकाणी रवी व फिर्यादी तरुणाची भेट झाली. या भेटीनंतर बोलत असतानाच या खोलीत तिघांनी प्रवेश केला. तसेच शिवीगाळ करत फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्या-चांदीचे लॉकेट असा 81 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले होते.

या गुन्ह्याचा तपास सिहगड रोड पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. यावेळी युनिट एकचे सचिन जाधव यांना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा जतीन पवार हा बिबवेवाडी परिसरात येणार आहे. त्यानुसार उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त डॉ शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी सचिन जाधव, प्रशांत गायकवाड, बाबा चव्हाण यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.

जतीन याचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले आहे. त्या मिळेल ते कामे करतो. आता त्याच्या त्या पळून गेलेल्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. जतीन याला पुढील तपसासाठी सिहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.