Pune : गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक; 40 किलो गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 40 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. रवींद्र योसेफ आढाव (वय 23, रा. अहमदनगर) व गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे (वय 41) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अवैध धंदेदेखील छुप्या पद्धतीने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेचे पथक विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कर्मचारी सचिन जाधव यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, टाटा इंडिगो कारमधून काही जण गांजा विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, कर्मचारी सचिन जाधव, इम्रान शेख, प्रशांत गायकवाड, महेश बागगुडे, तुषार माळवदकर यांच्या पथकाने सापळा रचून गाडी पकडली. त्यावेळी गाडीवर प्रेस असे इंग्रजीत लिहिलेले दिसून आले. कोणाला संशय येऊ नये म्हणून टाकले असल्याचे दिसून आले. गाडीची पाहणी केली असता, त्यात 37 किलो गांजा दोन गोण्या भरून मिळून आला. प्रेस स्टिकर सोबतच तालुका प्रतिनिधी निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष असेदेखील लिहिले होते. दरम्यान, दोघांवर यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यात एक गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे